सोमवार, २२ डिसेंबर, २०१४

21/9/2009 - RECESSION TIME रिसेशन !

21/9/2009 - RECESSION TIME

रिसेशन ! रिसेशन ! रिसेशन ! 

झाली किती कठीण परिस्थिती 
मोठी ऑर्डर नाही मिळत हाती 
कर्मचारी सर्व चर्चा करती 
आता कंपनीचे कसे होणार ? II१II

प्रतिस्पर्धी आमचे तगडे गडी 
आपणही तोडीस तोड मारू मुसंडी 
म्हणती असे कंपनीचे एमडी 
बनुया वर्ल्ड मार्केट लीडर II२II

कोणी म्हणे आहे आता रिसेशन 
पगारास लावले २०% व्हेरीएशन
एचआरचे स्वप्न नवीन ऑर्गनायझेशन 
चालल्या मोठमोठ्या घडामोडी II३II

जगामधे वाहती रिसेशनचे वारे
कंपनीमधे वर्ल्डक्लास कंपनीचे वारे
कर्मचाऱ्यांनो काळजी नका करू रे
म्हणती सदैव कंपनीचे मालक II४II

कोणांस वाटतो खेळ हा फसवा 
नका करू उगाच हो गवगवा 
नका पसरवू खोट्या अफवा 
दटावती कंपनीचे मालक II५II

जगात चालला खेळ अर्थकारण 
परिणाम तयाचा राजकारण 
कोणाचा जातो त्यात जीव अकारण 
म्हणती सृष्टीचाच हा नियम II६II

रीसेशनचे वारे सर्वत्र वाहती 
कोणी खोटे खोटे रडून घेती
कर्मचाऱ्यांचा पगार कापती 
नेमला एच आर मध्यस्थी II७II  

जुन्या कर्मचाऱ्यांना मारुनी लाथ 
नवीन कर्मचाऱ्यांची घ्यावी साथ 
आजच्या कंपन्यांचा पडला प्रघात 
वापरा आणि काढून टाका II८II

एच आर मधाळ गोड बोलतो 
गोड बोलुनी खेळ खेळतो 
स्वतःचे टार्गेट पूर्ण करतो 
दुसरा जाऊदेSना खड्ड्यात II९II

जुन्या कर्मचाऱ्यांचा पगार कापतो 
नवीन येणाऱ्यांस खिरापत वाटतो 
गोड बोलुनी खोटे रडून दाखवितो 
एच आर पक्का एक नंबर नाटकी II१०II

कोणांस कधी टर्मिनेट करती 
कोणांस नवीन कंत्राट पत्र देती 
जुनाच मॅनेजर नव्याने घेती 
पदोन्नतीचा खेळ खेळून II११II

कोणी दुसरा छान जॉब शोधतो 
कोणी स्वतःच राजीनामा देतो 
कोणी जातो विदेशी, परदेशांत 
स्वतःच्या करिअर प्रगतीसाठी II१२II

कोणांस रोकड देऊन घरी बसविती 
कोणांस नुसतेच कामाविना बसविती 
कोणाची बदली दुसरीकडे करती 
चालली सारी मजा मजा ! सजा II१३II

कोणी भीतीने कामात राबत बसती 
कोणी बॉसला शेंड्या लावून पळती 
कोणी बॉसची चमचेगिरी करती 
कोणी तोंडावर गोड,मागे शिव्या देती II१४II

कोणी शेअर बाजारात आहे म्हणतो  
शेअरचा फुगा फुगून फुगून फुगतो 
आणि एक दिवस ढुपकन फुटतो 
सेन्सेक्स कोसळला म्हणतो II१४II

आह्मी कर्मचारी आणि कामगार 
मॅनेजमेंटच्या सुरीची जाणतो धार 
नाही राहणार कोणीही बेकार 
मेहनती आणि कामसू आह्मी II१५II

कोणी म्हणे चुकीचे आपले कोटेशन 
ऑर्डर नाही, खूप आहे कॉम्पीटिशन 
कोणी म्हणे रिसेशन आहे रिसेशन 
कोणी म्हणे कधी संपेल हे रिसेशन?II१६II

लेखक / कवी  - सुरेश पित्रे.
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड, 
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९           

OLD MARATHI HINDI BLACK AND WHITE TV PROGRAMMES , SERAILS 70s,80s


खाजगी केबल वाहिन्या येण्यापूर्वी दूरदर्शनचा बोलबाला होता , त्यावर आधारित कविता लिहिली आहे 

ब्लॅक अँड व्हाइटचा जमाना होता I  
मराठीगुजराथीहिंदी तामिळ तसेच होते सिंधी I
सर्व भाषिकांना असायची संधी I फक्त दूरदर्शनवर IIII
चिमणराव आणि गुंड्याभाऊ I मैना आणि राघु काऊ I
मनोरंजनाचा होता खाऊ I सर्व प्रेक्षकांसाठी 
IIII
धिटुकल्या आणि आवडाबाई I किलबिल पहायची ताई I
करमचंद मालिका पहायची आई I तेव्हा दूरदर्शनवर 
IIII
जमाना होता ब्लॅक अँड व्हाइट I कार्यक्रम नव्हते हो वाईट I
सिनेमातील ढिशुम ढिशुम फाईट I दिसायची फक्त रविवारी 
IIII
कार्यक्रम होता फक्कड I सर्वांच्या आवडीचे होते नुक्कड I
गुरु-खोपडीची होती पकड I त्या हिंदी मालिकेवर 
IIII
फुल खिले है गुलशन गुलशन I अशोककुमार कधी राकेश रोशन I
नवीनच होते स्लो मोशन I क्रिकेट चित्रीकरणात 
IIII
सर्कस मालिका होती छान I कलाकार होता शाहरुख खान I
आता झाला तो महान I हिंदी सिनेमाचा हिरो 
IIII
मालिकेमधे धमाल मस्ती I चाळ नावाची वाचाळ वस्ती I
खर्च नव्हता जास्ती I तेव्हा मनोरंजनासाठी 
IIII
नवीन गाण्यांचं चित्रगीत I जुन्या गाण्यांचं छायागीत I
बरीच वर्षं होती एकच रीत I तेव्हा दूरदर्शनची 
IIII
पुढील कार्यक्रमांची सुचना I साप्ताहिकी आठवते ना ?
''व्यत्यय'' चा पडदा आठवतो ना ? फक्त दूरदर्शनवर 
II१०II
हरवलेल्यांची शोकांतिका I आपण ह्यांना पाहिलात का ?
कसा पिकवायचा मका I पहा 
आमची माती आमची माणसं II११II
मालिकांसाठी रांग लागायची I किती तरी दिवसांनी वेळ यायची I
मालिकेला संधी मिळायची I फक्त तेरा भागांसाठी 
II१२II
विनोदी कार्यक्रम गजरा I म्हणजे हास्याचा फवारा I
मराठी कलाकारांचा नखरा I फक्त दूरदर्शनवर 
II१३II
रविवारी सकाळी शुकशुकाट का ? कारण होते रामायण मालिका I
हनुमान जाळत होता लंका I रावण राक्षसाची 
II१४II
उजाडायची रविवार सकाळ I मालिका महाभारत विक्रम वेताळ I
हिंदी सिनेमाने सरायची संध्याकाळ I दूरदर्शनवर 
II१५II
चोराला पकडून पोलिस धन्य I मालिका एक शून्य शून्य I
मराठी मालिका सर्वमान्य I दूरदर्शन प्रेक्षकांची 
II१६II
ब्लॅक अँड व्हाइटचा जमाना होता I खाजगी वाहिन्यांचा सामना नव्हता I
जमाना तो जुना होता I गेला काळाच्या पडद्याआड 
II१७II
लेखक / कवी  - सुरेश पित्रे.पत्ता - "वैद्य सदन", 
पहिला मजला,राघोबा शंकर रोड,
चेंदणी,ठाणे (पश्चिम)पिन कोड क्र. – ४००६०१
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९           

शनिवार, २० डिसेंबर, २०१४

COW SONG - GOMATA SONG - IN MARATHI


PURANOKTA SHRI LAXMI LAKSHMI SUKTA

नमस्कार 
सूक्त म्हटले कि ती वेदातीलच असतात असे आहे ना ?
पण मी काल गजानन बुक डेपो दुकानात एका पुस्तकात पुराणोक्त श्री / लक्ष्मी सुक्त पाहिले 
ते कुठे महाजालावर आपण पाहिले तर मला पाठवाल का ?
ते प्रकाशन पुण्याचे आहे ,
धन्यवाद,
सुरेश पित्रे 

SANT TULSIDAS MAHARAJ - MARATHI ARTICLE - SANT VICHAR DHAN

संत विचार धन 
काही वेळा असे होते कि , रोगी पथ्य पाळतो , वेळेवर औषध घेतो पण तरीही
गुण येत नाही , तेव्हा लोकं म्हणतात कि काय भोग संपत नाहीत. काही जण 
मंत्र , स्तोत्र म्हणून पाहतात पण त्यानेही गुण येत नाही , तेव्हा लोकं म्हणतात 
मंत्राने काही बरे वाटत नाही , तर त्यात दोष मंत्राचा नाही. तर मग दोष काय ?
तर प्रज्ञापराध . म्हणजे काय ? तर बळाचा (बाहु बळ , बुद्धी बळ, पैशाचे बळ इत्त्यादी 
सात प्रकारच्या बळांचा) वापर करून तुम्ही गरिबाला (गरीब कोण तर जो वरील 
प्रकारे सात प्रकारचे बळ नसलेला ) त्याला तुम्ही जर त्रास दिला , छळ केला  
म्हणजे कचेरीत जो अधिकारी आहे त्याने शिपायाला / क्लार्कला विनाकारण 
त्रास दिला किंवा सासूने सुनेला / सुनेने सासूला विनाकारण त्रास दिला 
आणि त्या गरिबाला अबल असल्यामुळे त्या त्रासाला विरोध करता नाही आला 
आणि तो त्रास तसाच मनात राहून त्याचा आत्मा तडफडला तर तेव्हा 
त्याला तुम्हाला तोंडाने विरोध करता नाही आला तरी मनातल्या मनात 
तडफडत शाप दिला तर त्या शापामुळे येणाऱ्या भोगांना / आजाराला औषधाने , 
मंत्राने कशानेच गुण येत नाही , तेव्हा आपल्याकडून प्रज्ञापराध होणार नाही 
ह्याची काळजी घेतली पाहिजे, ह्यावर आधारित परमपूज्य स्वामी सवितानंद
ह्यांनी एक गोष्ट सांगितली कि त्यांच्याकडे असेच तीन भाऊ आले होते 
त्यांना क्षयाची बाधा झाली होती आणि कशानेच गुण येत नव्हता , तेव्हा 
स्वामिनी त्यांना विचारले कि तुमची आई आजारी होती आणि तुम्ही श्रीमंत 
असून सुद्धा तिच्या उपचाराकडे दुर्लक्ष केले का तर म्हणे म्हातारी मरणारच आहे 
कशाला खर्च करा ? पुढे ती आई वारली. आणि आता ह्या तिघांचे ह्यांचे म्हातारपण आले 
तेव्हा ह्यानाही क्षयानेच ग्रासले आणि आता कशानेच गुण येत नाही , पुढे ते तीघेही ह्या 
प्रज्ञा अपराधामुळे शेवटी मरण पावले , अर्थात हे भोग ह्या जन्मीचेच असतील असे नाही 
गेल्या जन्मीच्या प्रज्ञापराधाचेहि असू शकतात. स्वामीनी त्याला अनुसरून 
एक चांगला दोहा सांगितला 
“तुलसी हाय गरीब की , कबहू न निष्फल जाये ।
  मरे बैल के चाम सुं ,लोहा  भसम हो जाये ।
अर्थ असा कि गरीबाची हाय लागली कि तो मेल्यावर सुद्धा संपत नाही 
ती भोग भोगूनच संपवावी लागते , जसे कि बैलाला मारून त्याचे चामडे 
काढताना त्याने दिलेले शाप मेल्या नंतर त्याच्या चामड्यातूनही
लागतात आणि तो चामड्याचा भाता जेव्हा चालतो तेव्हा अत्त्यंत कठीण असे 
लोखंडहि विरघळते तिथे माणसाची / रोगांची काय कथा ?

GOD PUJA WIDHI VIDHI AND SOACIAL LOOK POEM


शुक्रवार, १९ डिसेंबर, २०१४

गो संरक्षण / संवर्धन करा - protect save indian cow

नमस्कार 
गोमाता आपली देवता - आपली संस्कृती हि कृषी आणि हृषी प्रधान आहे , मधल्या काळात 
ह्या संस्कृतीवर अनेक वेळा आक्रमणे झाली आणि होत आहेत , शेतकरी गाई बैल विकून 
मशीनने शेती नांगरू लागला , आणि पाहता पाहता गोधन दिवसा गणीक कमी होत गेले 
भारतीय वंशाच्या गाईचे दुध जे अमृतासमान मानले आहे ते प्रत्येक भारतीयाला मिळालेच 
पाहिजे , पण दुर्दैवाने आज तसे होत नाही , आपल्या घरी प्लास्टीक पिशवीत जे दूध येते 
ते जर्सी गाईचे असते असा काहींचा संशय आहे ,  भारतीय वंशाची गाय दूध कमी देते 
पण म्हणूनच ते अमृत मानले असावे , ती गाय दूध द्यायची बंद झाली कि मग बऱ्याच वेळा 
तीची विक्री केली जाते , आणि काही वेळा तर खाटीक खान्यात पाठविले जाते 
हि गोष्ट अत्त्यंत वाईट , वेदना देणारी आणि क्रूर अशी आहे , हे होऊ नये म्हणून 
काही गो संस्था कार्यरत आहेत , पण त्यांच्या कामाला गती देऊन पुन्हा नव्याने 
गोधन वाढावे अशी ज्यांची इच्छा आहे त्यांनी अशा गो संस्थाना दान देणगी द्यावी. 
त्यांनी कोणती योजना आखली आहे ? ह्या ज्या गाई आहेत ज्या दूध देत नाहीत 
ज्यांना भाकड गाई म्हणतात त्यांना एका वेगळ्या जागेत ठेवतात आणि त्यांच्यासाठी 
चारा भूमी राखीव आहे , मग आता कोणी म्हणेल त्याचा काय उपयोग ? तर ह्या गाई जरी 
दुध देत नसल्या तरी त्या मरेपर्यंत गोमुत्र आणि शेण देतात जे औषधी आणि अत्त्यंत उपयोगी  
असे आहे , अग्निहोत्र करण्यासाठी ज्या गोवऱ्या / शेण्या लागतात त्या ह्या गाईच्या 
शेणापासुन बनविल्या जातात , त्यामुळे प्रत्येकाने अग्निहोत्र करायला सुरुवात करावी 
आणि आपली जी शेती प्रधान संस्कृती आहे ती टिकविण्याचा आणि संवर्धन करण्याचा 
प्रयत्न करावा. पाश्च्यात्त्य संस्कृती हि कधीच समाजाला १०० टक्के शाश्वत सुख देऊ शकत नाही, 
आपण स्वतःला हिंदु धर्मीय / सनातन धर्मीय / किंवा वैदीक असे मानत असू तर 
आपल्याला प्रत्यक्ष गाय पाळता नाही आली तरी अशी अनेक गो उत्पादने आहेत 
जी आपण विकत घेऊन किंवा आपल्या वाढदिवसा निमित्त देणगी देऊन त्या
संस्थाना मदत करू शकतो. धन्यवाद, - सुरेश पित्रे , ठाणे 

रोगांची महासत्ता जगावर

रोगांची महासत्ता जगावर
आगामी काळात भारत देश जगावर महासत्ता गाजवणार ह्या विषयी जोरदार चर्चा सगळीकडे रंगत असतात पण त्या चर्चा कितपत योग्य आहेत ते माहित नाही , पण रोज गाय,कुत्रा,कावळा,मासा,मुंग्या आणि भुकेल्याला घास देऊन समाजाचा आणि निसर्ग पर्यावरणाचा समतोल साधा असे सांगणारी भारतीय संस्कृती सोडल्यामुळे आणि आंधळेपणाने पाश्चीमात्त्य संस्कृतीच्या मागे लागून झालेले दुष्परिणाम आता अगदी खूप वाढलेले दिसू लागले आहेत, आजुबाजुला मित्र नातेवाईकात मधुमेह,हृदय विकार, कॅन्सर सारखे आजाराचे वाढलेले प्रमाण सर्वत्र ऐकु येऊ लागले आहे. आज काय मामाला कॅन्सर झाला , उद्या काय तर मित्राच्या वडिलांना कॅन्सर झाला असे वरचेवर ऐकू येऊ लागले आहे. हे सुदृढ समाजाचे लक्षण नाही. त्यामुळे भारत महासत्ता बनणे वगैरे गोष्टीची चर्चा सोडून विश्वाचा, समाजाचा आणि निसर्ग पर्यावरणाचा समतोल साधणे ह्यातच संपूर्ण जगाचे, प्राणी सृष्टीचे आणि मानवाचे कल्याण आहे हे सुशिक्षित समाजाने समजून घेऊन आपल्या ऋषी मुनींनी गौरवलेल्या भारतीय संस्कृतीला आपले म्हणून ती स्वतः जगून टिकविणे आणि पुढच्या पिढीकडे सुपूर्द करणे ह्याकडे संपूर्ण भारतीय जनतेने लक्ष केंद्रीत करावे. कोणाची महासत्ता जगावर राज्य करणार हा प्रश्न सोडून द्या पण सध्या तरी रोगांची,प्रदूषणाची महासत्ता संपूर्ण विश्वावर आहे हे सुशिक्षीत समाजाला समजत नाही का ?
सुरेश पित्रे , चेंदणी,ठाणे. 

Artificial chemical smoke for mosquito is dangerous ?

डासांना पळवून लावण्याचा धूर आरोग्यांस हानीकारक ?
शहरी भागांत डासांना पळविण्यासाठी जो धूर केला जातो तो आरोग्यास 
हानिकारक तर नाही ना ? हा धूर कृत्रिम रासायनीक कीटकनाशके जाळून केलेला धूर असतो का ?
जर हा धूर मानवी आरोग्यासाठी अपायकारक असेल तर त्या ऐवजी शेणाच्या गोवऱ्या 
जाळून धूर करणे हे जास्त योग्य ठरेल का ? गावातून ह्यासाठी शेणाच्या गोवऱ्या 
मोठ्या प्रमाणात विकत घेऊन त्या शहरात जाळण्याची व्यवस्था केली तर गावातील 
लोकांना आर्थिक मदतहि होईल. शेण्या जाळून केलेला धूर आणि त्या नंतर निर्माण होणारी राख पर्यावरणास उपकारक आहे अशी माहिती महाजालावर वाचायला मिळते. सध्या जो धूर फवारला जातो त्या धुराच्या वासावरून प्रथम दर्शनी तरी असे वाटते कि तो आरोग्यासाठी चांगला असेल असे वाटत नाही, तेव्हा ह्या गोष्टीची आधुनिक शास्त्रीय दृष्ट्या योग्य माहिती लोकांना कळावी आणि ह्या विषयाची शहानिशा करून शेण्या जाळून धूर करणे योग्य असेल तर ते करावे.
सुरेश पित्रे , ठाणे 

नर्मदा परिक्रमेचे अनुभव - Experience of Narmada parikrama - suresh pitre

Narmada Parikrama 2014 - Suresh Pitre
नमस्कार 
सौ प्रतिभा सुधिर चितळे आणि श्री सुधिर चितळे यांनी 
केलेल्या नर्मदा परिक्रमेचे अनुभव क्रमशः भाग एक ते अठरा . 
ह्या लिंकवर ऐकावे / पाहावे . हे अनुभव कथन इतके छान झाले आहे कि 
ऐकता ऐकता आपण नर्मदा किनारीच पोचलो आहोत असे वाटते ,
एकूण अठरा भाग सगळे एकच वेळी वेळ काढून ऐकले तर छान वाटते ,  
अंदाजे साडेतीन - चार तास लागतात , आपणही ऐकावे . 
             असे म्हणतात कि असे वर्णन ऐकले तरी मानसिक परिक्रमा पूर्ण 
झाल्याचे फळ मिळते , फळ मिळते का नाही ह्याचा विचार करण्यापेक्षा तुम्हाला 
जर आवड असेल तर , हे ऐकताना आपणही परिक्रमा करतो आहोत असेच क्षणभर वाटायला लागते. हे एक वेगळेच जग आहे , 
      श्री दत्त अवतार परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी ( श्री महाराजांचे जन्मगाव माणगाव, महाराष्ट्र आणि समाधीस्थळ श्री क्षेत्र गरुडेश्वर, मध्य प्रदेश ) ह्यांचा समाधी शताब्दी महोत्सव श्री क्षेत्र गरुडेश्वर इथे वर्षभर चालु होता , समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त माझी अशी इच्छा होती कि श्री महाराजांनी त्यांच्या परीक्रमेच्या वेळी जिथे चातुर्मास केला आणि नर्मदा नदी किनारीच अन्य ठिकाणीही त्यांची काही स्मृति स्थळे आहेत तिथे समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त जावे. ती माझी इच्छा नर्मदा परिक्रमेच्या निमित्ताने श्री नर्मदा मैयाच्या / देवीच्या आणि सद्गुरूंच्या आशीर्वादाने पूर्ण झाली. नर्मदा परिक्रमेची ध्वनिचित्रफीत ह्या लिंकवर आहे , नर्मदे हर !
- सुरेश पित्रे,ठाणे , महाराष्ट्र 

कर्दळी वन एक अनुभूती, कि ब्रह्मांडनायक एक अनुभूती ?

कर्दळी वन एक अनुभूती, कि ब्रह्मांडनायक एक अनुभूती ?
गेल्याच महिन्यात नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आलो आणि महाजालावर कर्दळी वन हि ध्वनीचित्रफित पाहण्याचा योग आला , हे स्थान अत्त्यंत रमणीय आणि तुरळक मानवी वसती असलेले होते , असेच म्हणावे लागेल , कारण आता तिथे जाणाऱ्या भाविकांची संख्या '' कर्दळी वन एक अनुभूती '' हे पुस्तक प्रकाशित झाल्यापासुन वाढलेली आहे , हि ध्वनीचित्रफित उत्तम चित्रीकरण , श्रवणीय आवाजातील निवेदन , ह्या सर्वच गोष्टीनी छान अशीच बनली आहे. पण सर्वात शेवटी आणि सुरुवातीला तिथे एक खटकणारी आणि आध्यात्मिक क्षेत्रात घुसखोरी म्हणता येण्यासारखी गोष्ट आहे , ती म्हणजे इथे सरकारने आवश्यक सोयी सुविधा पुरवाव्यात ? तेव्हा माझे असे ठाम मत आहे कि तुम्ही जर खरे ईश्वर भक्त असाल तर ह्या मागणीला कोणीही पाठिंबा देऊ नये , कारण ! सोयी सुविधा वाढल्या कि सांड पाणी सोडणार कुठे ? म्हणजे मग ते सखल भागात खाली कृष्णा नदीत सोडणार ना ? कारण सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प वगैरे भारत देशात तरी अजून स्वप्नवत आहेत , आणि झाले तरी ते भ्रष्टाचारामुळे कितपत कार्यरत राहतील हे माहित नाही ? हे मी नर्मदा परिक्रमेत सुद्धा प्रत्यक्ष पाहुन आलो , ओम्कारेश्वरला एकीकडे 
गोमुखातुन नर्मदा वाहते , ते तिथेच थोड्या अंतरावर वरच्या नागरी वस्तीचे सांडपाणी 
थेट नर्मदा नदीत सोडले आहे , हे पाहून चीड येते. नदीचे , स्थानाचे पावित्र्य जपणे हि खरी 
भक्ती असावी. 
१) तसे म्हटले तर हे पुस्तक प्रकाशित झाल्यापासुनच लोकांचा त्या पवित्र वास्तुत वाढलेला वावर.
तो लोकांचा ओघ आता आहे इतपतच सिमीत ठेवावा, तो वाढू नये. 
२) जिथे मूर्ती वगैरे काहीहि नव्हते , तिथे आज मूर्ती स्थापना झाली आहे , हळु हळु सोयी सुविधा, 
ध्यान धारणा केंद्र , मठ / मंदिर उभारणीच्या नावाखाली तिथली झाडे आणि पर्यावरण ह्यांचा नाश ,
आणि वरकढी म्हणजे ''इतकी जंगले आहेत थोडे तोडले तर काय झाले'' असे हळूच म्हणणाऱ्या महाभागांचे सूर. मठ,मंदिर झाले कि शहरी जीवन जगणारे त्यांना सुटी कमी पडते म्हणून आणि वृद्धाना सोयीचे म्हणून चार दिवसाची यात्रा एक दिवसात होण्यासाठी त्या स्थानावर पोचण्यासाठी रस्ता पाहिजे असे म्हणतील , बोटीतून नदी पार करण्याऐवजी कृष्णा नदीवर वाहनांसाठी पूल पाहिजे , भक्तांची गर्दी वाढली कि मग भक्त निवास बांधणे अशा मागण्या , मग हे सर्व सांभाळायला ट्रस्ट , पुढच्या बाजारी करण होणाऱ्या गोष्टींची हि नांदी आहे , आणि ह्या सर्व सावळ्या गोंधळात खऱ्या भक्ती भावाला मूठमाती , असे चित्र जे इतर काही तीर्थ क्षेत्रांचे झाले आहे , तसे व्हायला वेळ लागणार नाही. 
ह्या ध्वनी चित्रफितीत सुरुवातीलाच उल्लेख आहे कि जे तिथे आत्ता व्यवस्था पाहतात तिथे 
वन विभागाने कारवाई करून त्यांचे तात्पुरते निवासी बांधकाम पाडले होते, चिंचू जमातीचे तिथले मूळ रहिवासी आजही धनुष्य बाणाने शिकार करून , शेती करून स्वतःची उपजीविका करतात . 
ते स्थान तशाच अवस्थेत मूर्ती स्वरूप मानून जपले पाहिजे , 
३) स्वामींचे वाक्य '' मै गया नही, झिंदा हु '' ह्या वाक्याचा अर्थ जर अशा तर्हेने लावला कि 
ईश्वर सर्व चराचर व्यापून आहे, फक्त आपण भक्त प्रल्हाद बनण्याची गरज आहे , 
भक्त प्रल्हाद होण्यासाठी काय आवश्यक आहे ते करावे , उगाच कापराच्या मशाली तिथे 
पेटवून त्या प्राचीन निसर्ग निर्मित गुहा काजळी युक्त करण्याची गरज आहे का ?
४) तिथे स्वामींचे एक पाऊल उमटलेले आहे असे दाखविले आहे , ते पुढल्या सर्व भक्तांना 
पहायला मिळावे असे वाटत असेल तर त्याला पाणी वाहणे जरुरी नाही , आत्ता पाणी वाहिले  
पुढे दुध , मध ,तूप असे अभिषेक सुरुवात होऊन ते पाऊल ओळखता येत नाही 
असे व्हायला वेळ लागणार नाही ,
५) भक्तांची गर्दी वाढली कि मग व्ही आय पीं ची पैसे देऊन वेगळी रांग , मी नर्मदा परिक्रमेला 
जायच्या आधी गाणगापुर इथे दर्शनाला गेलो होतो , उद्देश हाच होता कि परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या समाधी शताब्दी वर्षा निमित्त ह्या स्थानांना भेट देणे गाणगापुर इथे टुरिस्ट बसने गेलो होतो , पण तिथला वाईट अनुभव गाठीशी होता ,  
ब्राह्मण अक्षरशः लोकांना पुढे ढकलत होते , विशेष रांगेसाठी पैसे देऊन प्रवेश देतो , असे म्हणताना ह्यांना काहीच भीड कशी वाटत नाही असा प्रश्न मला पडला , देवाच्या दरबारात देवाचाच बाजार ? 
शेवटी मनस्वी चीड येऊन मी त्यांना म्हटले '' अशा बाजारी करणाची शिक्षा भोगावी लागेल '' हे श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे वाक्य तुम्ही विसरलात का ?
शेवटी त्या धक्का गर्दीतून बाहेर आल्यावर मी बाहेरच्या ब्राह्मणांना म्हटले कि ह्यांना नीट शेवट पर्यंत रांग बनविता येत नाही का ? आधी रांग आहे तशीच जर शेवटपर्यंत लोखंडी खांब लावुन जर गर्दी नियंत्रणात ठेवली तर दर्शन धक्क्याविना सहज शक्य आहे , पण ते असेच आहे पाणी टंचाई ठेवली कि टॅंकरचा व्यवसाय तेजीत , घरांची टंचाई असली की उच्च भावाने बँकांचा / घर व्यवसायिकांचा सर्व संबंधितांचा उद्योग तेजीत. तसे भाविकांची धक्का धक्की तशीच राहिली कि विशेष दराने व्ही आय पीं रांगेचा उद्योग तेजीत, तरी बाकी देवस्थानांपेक्षा इथे बाजारीकरण कमी आहे असे ऐकुन होतो ते काही पटले नाही. 
६) त्या स्थानावर श्री मार्कंडेय ऋषी, श्री आद्द्य शंकराचार्य , श्री अक्क महादेवी, श्री टेंबे स्वामी इतक्या थोर विभूती तिथे पायी पोचल्या किंवा त्या स्थानावर त्यांनी अनुष्ठान , उपासना केली , त्यांनी तिथे '' कर्दळी वन एक अनुभूती, ह्या बरोबरच ''ब्रह्मांडनायक एक अनुभूती'' असाही अनुभव तिथे घेतला असावा असे आपण म्हणू शकतो. 
तर अशाच उपासना आज जे खरे साधक / भक्त त्या आध्यात्मिक पातळीचे आहेत त्यांच्यासाठी हे स्थान राखीव असावे असे मला वाटते . असे म्हटल्यावर एक महाभाग मला म्हणाले '' कशाला ते जातील दुसरीकडे , बरीच जंगले आहेत , म्हणजे आणखी अशी धार्मिक स्थळे वाढतील , हिंदु धर्म वाढायला नको का? म्हणून मी पुस्तक विकत घेतले आहे , कर्दळी वनात जाऊन पण आलो ? '' मी कपाळाला हात लावला , अशी भावना ठेवुन कोणी तिकडे जात असेल तर कसे होणार ? '' विश्व स्वधर्म सूर्ये पाहो '' असे म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर माउलीना असा धर्म अपेक्षित होता का ? 
जे समाजासाठी चांगले ते म्हणजे धर्म आणि समाजासाठी जे वाईट तो अधर्म इतकी सोपी व्याख्या 
असावी, धर्म शब्दाच्या आधी कोणत्या नावाचा उल्लेखच कशाला हवा , आज पर्यंत सर्व संतानी 
अधर्म सोडून धर्माने वागा म्हणून सांगितले त्याचा अर्थ हाच तर आहे ना ?
आणि म्हणून ह्या लेखाचे जे शिर्षक आहे ''कर्दळी वन एक अनुभूती, कि ब्रह्मांडनायक एक अनुभूती ?'' ह्या विषयी मला असे म्हणावेसे वाटते कि ज्याला अध्यात्म वाटेने जायचे आहे त्याला ''ब्रह्मांडनायक एक अनुभूती'' असे म्हणावेसे वाटले पाहिजे , त्यासाठी आपला भाव असा व्हायला पाहिजे कि सर्व चराचर ईश्वर मय आहे , पण तो भाव मात्र अशा स्थानावर गेल्यावर जास्त जागृत होतो आणि त्या भावात ज्यांना कायमचे रममाण व्हायचे आहे अशासाठी हि स्थाने प्रामुख्याने आहेत. मग सर्व चराचर विश्व ईश्वरमय आहे असा भाव पक्का झाला कि मग ''मी'' त्याहुन वेगळा नाही हा भावही जागृत व्हायला लागतो , माझ्यासकट सर्व चराचर विश्व ईश्वरमय आहे अशा भावाचे मनन चिंतन सुरु होते , मग आपले आपल्यालाच हसु येते कि मी ज्याला देवळात जाऊन पाहतो आहे , पुजतो आहे तो जर अशा भावनेतुन आपण पाहायला शिकलो तर त्या सर्व गोष्टी पुजा,अर्चा,भजन, जप हळु हळु गळून पडतात , आणि मग ते केले तरी तोच भाव आहे आणि नाही केले तरी तोच भाव आहे हे जेव्हा साधले जाते ती ''भक्त '' हि अवस्था असावी असे मला वाटते , अशा भावापासुन जो वेगळा / विभक्त होत नाही तो खरा भक्त. पण आज काल काय जो उठतो तो म्हणतो मी स्वामींचा भक्त , मुलगा गणपतीचा भक्त , बायको देवीची भक्त . भक्त हा शब्द कोणीही उठून खिशातील दहा रुपयाची नोट पटकन काढावी असा इतका सोपा आहे का ? 
भक्त हि संज्ञा ''चणे खावे लोखंडाचे'' अशी कठीण आहे हे आपल्यासमोर अनेक थोर संत मंडळींनी आपल्या जीवन चरीत्रातुन समोर ठेवले आहे. पण भक्त प्रल्हाद निर्माण व्हायला आणि अशा भक्ताचे दर्शन आपल्याला व्हायला युगे लोटावी लागतात. 
त्या स्थानावर भाऊ गर्दी करणाऱ्या भाविकांपैकी किती जण एकटे तिथे राहायला तयार आहेत ?
जो एकता राहायला तयार होईल तेव्हा पाटुकले साहेबांनी ध्वनिफितीत म्हटल्याप्रमाणे करोडोतून एखदी व्यक्ती तिथे जाऊ शकते हे वाक्य त्या व्यक्तीला सार्थ ठरू शकते , नाहीतर हे शिष्याने , विद्यार्थ्याने उठून शिक्षकाच्या खुर्चीत बसल्यासारखे होईल नाही का ?
कर्दळी वन हे स्थान खऱ्या साधकासाठी राखुन ठेवावे , उगाच तिथे सर्वांनी गर्दी करू नये .
अर्थात हे सांगून किती लोकं हे मानतील ह्याची शाश्वती नाही हे आत्ता असलेल्या 
बाकी तीर्थ स्थानावरून कळतेच आहे . शेवटी खऱ्या साधकाला लोकं संसारात स्वस्थ 
बसू देत नाहीत आणि तो अशा निर्जन ठिकाणी गेला तर तिथेही लोक भाऊगर्दी करतात . 
शेवटी अशा साधकांना त्याचा त्रास होऊन त्यांना अन्य जंगलात किंवा निर्जन स्थानात आसरा घ्यावा लागेल नाही का ?  
थोडक्यात काय तर ''कर्दळी वन एक अनुभूती'' हि आत्ता जशी लोकांना अनुभवायला मिळते आहे 
तशीच राहावी त्याचे जास्त शहरीकरण आणि पुढे जाऊन बाजारीकरण होऊ देऊ नये आणि माझ्यासकट सर्वाना ''ब्रह्मांडनायक एक अनुभूती'' हेही अनुभवायला मिळावे हीच श्री चरणी इच्छा. 
सुरेश पित्रे , ठाणे 
9004230409

हा दोष मोनो रेल्वे यंत्रणेचा नाही. - Mono railway is best. - Suresh Pitre,Thane

हा दोष मोनो रेल्वे यंत्रणेचा नाही. 
मोनो रेल्वे तोट्यात जात आहे असा एक सूर सगळीकडे आळवला जात आहे 
पण त्यामधे दोष मोनो रेल्वे ह्या यंत्रणेचा नाही हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं 
कारण मोनो रेल्वे चांगली कि मेट्रो रेल्वे ह्या विषयी मुख्य मुद्दे आणि माहिती देणारा  
सविस्तर तुलनात्मक तक्ता वृत्तपत्रातुन प्रकाशित झालेला होता. त्या मधे 
जर प्रत्येक मुद्द्याला गुण दिले असते तर मोनो रेल्वे श्रेष्ठ ठरेल असे ठरविणारा 
तो तक्ता होता. पण तरीही मुंबईत बरेच ठिकाणी मेट्रोला डावलून मोनो रेल्वे प्रकल्प राबविला 
गेला तो का ? , ह्याचे स्पष्टीकरण तज्ञ देऊ शकतील का ? कारण त्या तक्त्यात स्पष्टपणे दिले होते कि मोनोच्या तुलनेत मेट्रो मधे सीमेंट काँक्रिट , लोखंड आदि सर्व सामग्री जास्त प्रमाणात लागते त्यामुळे एकंदर प्रकल्पाचा खर्चही मोनोच्या तुलनेत मेट्रो रेल्वेला जास्त येतो , पण तोच खर्च जर अधिक लांबीच्या मोनो रेल्वेवर विभागला गेला असता तर जास्त क्षेत्रफळात आणि एकूण जास्त किमी लांबीची रेल्वेची सेवा जनतेसाठी निर्माण करता आली असती , पण हा स्पष्ट तक्ता समोर असतानाहि अशी योजना का राबविली गेली ह्याचे स्पष्टीकरण योजना राबविणारे देऊ शकतील का ? तेव्हा मुख्य मुद्दा हाच आहे कि मोनो रेल्वे तोट्यात आहे ह्या गोष्टीचा आणि तांत्रिक दृष्ट्या त्या यंत्रणेचा किंवा त्या प्रकल्पाचा ह्यात दोष नाही. मेट्रो पेक्षा मोनो रेल्वेच जास्त ठिकाणी राबविली असती तर श्रेष्ठ ठरली असती असे तुलनात्मक तक्ता सांगतो. कारण ती शहराच्या गजबजलेल्या वस्तीत छोट्या रस्त्यावरूनही धावू शकते हा मुख्य मुद्दाही त्यात होता. तेव्हा आता ठाणे आणि इतर गजबजलेल्या भागात मोनो किंवा मेट्रो प्रकल्प राबविताना तरी ह्या गोष्टीचा पुनर्विचार आधीच व्हावा. 
- सुरेश पित्रे , चेंदणी ठाणे 

खरे मनोरुग्ण किंवा वेडे कोण ?

खरे मनोरुग्ण किंवा वेडे कोण ?
हल्ली कुठेही काही तोडफोड वगैरे घटना घडल्या कि लगेच बातमी येते कि मनोरुग्णाने 
केली तोडफोड. मला अतीरेक, तोडफोड ह्या गोष्टीचे समर्थन करायचे नाही, पण जेव्हा एखादी 
घटना घडते तेव्हा आधीच्या क्रीयेविरुद्ध प्रतिक्रिया हि गोष्ट असेल तर सायन्सच्या नियमाप्रमाणे 
ती योग्यच असते ना ? आणि हा विषय पूर्वीही चर्चा करण्यात आलेला आहे कि मनोरुग्ण ,
नक्षलवादी आणि अतिरेकी ह्यांना तसे म्हणायचे का ? कारण ते तसे घडलेत त्याची कारणे कोण शोधणार आणि त्यांना तुम्ही काय म्हणणार , अत्ताच गेल्या आठवड्यात एक घटना घडून गेली आहे त्यातही हीच गोष्ट चर्चा करण्यासारखी आहे , कि जेव्हा तुम्ही प्रतिक्रियेला अतिरेक म्हणता मग आधी कोणीतरी काहीतरी (तितकीच अतिरेकी) क्रिया उद्योग केला आहे कि त्याला इतकी अतिरेकी प्रतिक्रिया झालेली तुम्हाला दिसते आहे त्यांना तुम्ही काय म्हणणार ? अतीरेकाचे समर्थन नाही पण कोणावर अन्याय होऊ नये हे पाहणे गरजेचे आहे, कारण अतिरेकी ,मनोरुग्ण असे शिक्के मारून तो विषय तिथे संपवायचा कि काम झाले असे आज झाले आहे. त्या गोष्टीच्या मुळाशी कोणी जात नाही जे फक्त ''दो आँखे बारह हाथ '' सारख्या चित्रपटात होऊ शकते.
पण ते करायला आज कोणाकडे वेळ आणि इच्छा आहे ? त्यापेक्षा मानसीक रुग्ण,अतिरेकी  हा शिक्का मारणे सोपे आहे. आणि आज जगात हेच चालले आहे काही २० टक्के माणसांच्यामुळे 
ज्यामधे कोण लोकं येतात तर गरजेपेक्षा जास्त अती महत्वाकांक्षी, भ्रष्टाचार करणारे राजकारणी, लोकांना उल्लू बनवून स्वतः करोडपती बनणारे सिनेनट, अती महत्वाकांक्षांमुळे ( वेड्यासारख्या हपापलेपणामुळे ) म्हणजे आज प्रत्येकाला असे वाटते कि मला कोणीतरी मोठे व्हायचे आहे पण ह्या मोठे होण्याच्या वेडापायी बाकीच्या ८० टक्के लोकांचे मरण होत असेल तर त्या मोठेपणाला काही अर्थ आहे का ? त्याचे लांगुलचालन किती करायचे ? अत्ताच एका क्रिकेट पटूच्या मानसिक अवस्थेचे कोण कौतुक करण्यात आले ? म्हणजे जगात अशी कितीतरी माणसे आहेत ज्यांच्या मानसिक अवस्थेचा कधी कोणी विचार केला आहे का ? उगाचच एखाद्या उद्दिष्टासाठी वेड्यासारखी मेहनत घेऊन बाकीच्यांना पायदळी तुडवून विजय साजरा करणे ह्या (विकृत) मानसिक अवस्थेला तुम्ही काय म्हणणार ? आज खरे वेडे कोण आहेत म्हणजे ज्यांच्यामुळे (२० टक्के लोकांमुळे ) मानसिक रुग्ण तयार होत आहेत ते वेडे कि ज्यांना समाज मानसिक रुग्ण हा शिक्का मारतो आहे ते वेडे ? मानसोपचार तज्ञांनीहि हि गोष्ट सामाजिक व्यासपीठावर चर्चा आणि विचार करण्यासारखी आहे. - सुरेश पित्रे , ठाणे