गुरुवार, १५ नोव्हेंबर, २०१८

जय हो जय हो / गिरी नारायण


नमस्कार 
सुरुवातीला ओवीबद्ध अर्धे लिहून झाले होते पण मग अचानक पुन्हा अभंगात 
लिहावे असेच वाटायला लागले मग तसेच लिहिले - श्रीदत्त गुरूंची इच्छा 
आता ह्यावर्षी गिरनार परिक्रमा करण्याची इच्छा आहे त्याआधीच हे लिहून झाले आहे. पाच टप्प्यात हि यात्रा होते तसे मधे विभाग केले आहेत. 

जय हो जय हो / गिरी नारायण - अभंग ६/६/६/६

गजानन आता / प्रथम वंदितो / गिरनार कथा / अशी हि लिहितो //१//
नाही मी पाहिला / अजून गिरी तो / गद्य ते वाचलें / फक्त इथे आतां //२//
नाही मी पाहिली / पाऊले दत्तांची / आधीच लिहिलें / कसे ते वर्णन //३//
वाचले वर्णन / गद्य मराठींत / वाटलें लिहावें / तेंच अभंगांत //४//
सद्गुरू प्रेरणा / झाली ती मनांत / म्हणून असे हे / लेखन करतो //५//
कुलदेव वंदूं / कुलदेवी वंदूं / सद्गुरु चरण / तसेच ते वंदूं //६//
नमितो शारदा / काव्याची देवता / नमितो नर्मदा / माय आतां माझी //७//
सत्व रज तम / त्रिगुण स्वरूपी / ब्रह्मा विष्णु शिव / दत्तगुरु वंदू //८//
दत्तांच्या पादुकां / गिरनार स्थितं / लिहितो कथा ती / जय गिरनारी //९//
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
गिरनार क्षेत्रीं / श्री दत्त गुरूंचे / निवास स्थान हे / पादुका रूपाने //१०//
श्री दत्त प्रभूंची / पाऊले तिथेच / दर्शनं घेउनी / भक्त होती धन्य //११// 
पादुका दर्शनं / घेण्यासाठी आधी दहा हजार त्या / चढाव्या पायऱ्या //१२//
पर्वत उत्तुंग / चढावा लागतो / तेव्हा ते दर्शन / होते पादुकांचे //१३//
भक्तांचा निर्धार / नाही अहंपणा / त्यांच्या तो चित्तांत / भक्तीभावं फक्त //१४//
   गिरनार क्षेत्रं / गुजरात इथें / सौराष्ट्र प्रांतात / जुनागढ पाशी //१५//
मुंबई पासून / अहमदाबाद / प्रवांस रेल्वेने / हेंच सोयीस्कर //१६//
मग जुनागढ / ते गिर पायथा / पाच मैलांचा हा / प्रवांस थोडासा //१७//
गिर पायथ्याला / स्थानीक नावाने / तळेटी हे नाम / असे म्हणतात //१८//
तिथे धर्मशाळा / जिथे हो मुक्काम / साधु नि संतांचा / भक्त विसावती //१९//
गिरनार इथे / अनेंक शिखरे / श्रीदत्त शिखरं / जिथे त्या पादुका //२०//
पायऱ्या चढणे / शिखर गाठणे / अंदाजे असे ते / सहा तांस होती //२१//
पुन्हा उतरणे / पायथा गाठणे / पुन्हा सहा तांस / तसेच लागती //२२//
दहा हजार त्या / पायऱ्या चढणे / म्हणून पहाटे / सुरुवात होतें //२३//
प्रथम पायथा / इथे हनुमंत / मंदिर सुंदर / लंबे हनुमान //२४//
हनुमान भव्य / मूर्तीचे दर्शन / मंदिरीं घडते / सर्वच भक्तांना //२५//
प्रथम मारुती / दर्शन करुनि / बळ ते घेउनी / चढाव्या पायऱ्या //२६//
संकट मोचक / हनुमान इथे / दर्शन छान ते / मग आरंभ तो //२७//
सद्गुरु स्मरण / दत्त दिगंबर / नामस्मरण ते / अखंड चढतां //२८//
सुंदर पवित्र / वातावरण ते / तन मन छान / प्रफुल्लीत होतें //२९//
मोठा तो पल्ला / एकेक पायरीं / चढतां पाहणे / वानरसेना ती //३०//
दऱ्या खूप खोल / सौंदर्य छान ते / नयनरम्य हा / परिसर छान //३१//
पहिला टप्पा हा / दोन हजार नि / पाचशे पायऱ्या / होतात ह्या पूर्ण //३२//
इथे खडकांच्या / गुहेत मूर्ती ह्या / राजा भर्तृहरी / राजा गोपीचंद //३३//
दोन्हीही मूर्ती त्या / आहेत सुंदर / त्यांना ते इथेच / झाले दत्त दर्शन //३४//
दोन्हीही राजांनी / गोरक्ष नाथांच्या / आदेशावरून / त्याग मोठा केला //३५//
राजदरबार / सोडून वैभव / गिरनार इथे / साधनेंस बसलें //३६// 
दत्त आदिगुरू / झाले ते प्रसन्न / साक्षांत दर्शन / इथेच त्यां झालें //३७//
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
दुसरा टप्पा तो / माली परब हा / प्रत्येकाला इथे / मिळते जल हो //३८//
मातीच्या रांजणीं / थंडगार पाणी / स्वच्छ सुमधूर / मिळते प्यायला //३९//
अमृतासमान / जल ते वाटते / प्रवास मग तो / होतो हा सुसह्य //४०//
तिथेच बाजूला / श्रीराम लक्ष्मण / सीता ह्यांचे तेहो / मंदिर ते आहे //४१//
तिसरा टप्पा तो / तीन हजार नि / पाचशे पायऱ्या / गढी कोट नांव //४२//
इथे तो असा हा / जैन मंदिरांचा / मोठा तो समूह / पहाया मिळतो //४३//
तयांत प्रमुख / मंदिरे अशी हो / नेमीनाथ आणि / वृषभदेव ह्यांची //४४//
देवीदेवतांची / मंदिरे अनेक / लहान मोठी ती / भोवती दिसती //४५//
सर्व मंदिरांची / आंत नि बाहेर / कलाकुसर ती / सुरेख नि छान //४६//
कोरीव काम ते / अप्रतीम असे / सुंदर नक्षीदार / दगड कोरले //४७//
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
मग आता येतो / चवथा टप्पा तो / अंबाजी मातेचा / आदिमाया देवी //४८//
पर्वतावर या / शक्तीचे मंदिर / पुरातन फार / आहे शक्तीपीठ //४९//
  बावन्न देवीची / अशी शक्तिपीठे / तयातील आहे / एक शक्तीपीठ //५०//
अंबाजी मातेची / मूर्ती भव्य अशी / सुंदर देखणी / नमूं जगदंबा //५१//
तिच्या समोर ते / वाहन मातेचे / सिंह मूर्ती छान / तशीच दिसते //५२//
स्थान हे अत्त्यंत / आहे हो जागृत / सांगती स्थानिक / महिमा तियेचा //५३//
जशी मुंबईत / मुंबादेवी खास / तशीच इथे हि / श्री अंबाजी माता //५४//
गुजराती इथे / पती पत्नी असे / जोडीने येउनी / दर्शन घेतांत //५५//
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
पुढे येतो असा / पाचवा टप्पा तो / गोरक्ष नाथांच्या / पादुका दिसती //५६//
गुरु गोरक्षांनी / ह्या पर्वतावर / धुनी पेटवून / तपश्चर्या केली //५७//
होऊनी प्रसन्न / श्रीदत्तात्रेयांनी / प्रत्यक्ष त्यांना ते / आलिंगन दिले //५८//
जागेवर त्याच / गोरक्ष नाथांची / धुनी व पादुका / पहाया मिळती //५९//
गिरनार इथे / गोरक्ष शिखर / सर्वोच्च शिखर / मानले जाते हो //६०//
पण इथे अशी / गोष्ट ती अद्भुत / पहाया मिळते / कशी ती पहा //६१//
श्रीदत्त शिखर / इथून पाहतां / गोरक्ष शिखर / उंच दिसते हो //६२//
गोरक्ष शिखर / इथून पाहतां /  श्रीदत्त शिखर / उंच दिसते हो //६३//
गोरक्षांचे तप  / श्री दत्त पहाती / आशीर्वाद देती / तुझे स्थान ऊंच //६४//
पण गोरक्ष म्हणे / विनंती करून / आपण आहांत / गुरुमहाराज //६५//
तेव्हा आपणंच / रहावे ऊंच ह्या / शिखरीं इथे हो / माझ्यापेक्षा ऊंच //६६//
साधूंच्या तोंडून / ऐकल्या गोष्टींचा / प्रत्यय इथे हो / येतो ह्या शिखरीं //६७//
पाहतां दोन्ही हो / आळीपाळीने ते / शिखरें ऊंच ती / दोन्ही हो दिसती //६८//
गोरक्ष शिखरं / प्रथम दिसतें / मग ते शिखर / दत्त नामें तेहो //६९//
पायथ्यापासून / इथपर्यंत ह्या / पायऱ्या अशा हो / दहा हजार त्या //७०//
जातो शीण सारा / दर्शन होतां ते / पावलांचे इथे / भाविक भक्तांना //७१//
वाटे आपणांस / आश्चर्य हे झालें / कसा मी आलो हा / पायऱ्या चढून //७२//
एरवी आपण / चढता शंभर / पायऱ्या चालून / आपण थकतो //७३//
या अनुभवाने / प्रचिती गुरूंची / कृपादृष्टीची ती / येतसे वाटते //७४//
मन थक्क होतें / अष्टसात्वीक ते / भाव ते दाटून / येती शरीरांत //७५//
भक्ती भाव असां / येतो हा दाटून / श्री दत्त चरणी / लोटांगण होतां //७६//
भावविभोर नि / कृतकृत्त्य वाटें / पावन झाला हा / मानव जन्म हो //७७//
श्री दत्तगुरु जे / आदिगुरू देव / ब्रह्माण्डनायक / सद्गुरू समर्थ //७८//
परम पवित्र / पावले अशी हि / इथे उमटली / उंच ह्या शिखरीं //७९//
ते शिखर कसें / ऊंच तो सुळका / बाजूला दगड / निमुळते असे //८०//
जणू ती रचना / अशी वाटते हो / कोणत्याही क्षणी / खाली कोसळेल //८१//
जणू चिकटलें / मोठाले दगड / इथे सुळक्याला / अधांतरी असें //८२//
खरोखर वाटें / इथे चमत्कार / पाऊले दिसती / श्रीदत्त पादुका //८३//
ज्यावेळी श्रीदत्त / झाले अंतर्धान / तयाची हि खूण / ठसा पावलांचा //८४//
रूप मनोहर / रूप पादुकांचे / पाहुनी ते भक्त / धन्य धन्य होती //८५//
पुजारी एक ते / पावला जवळी / दुसरे पुजारी / देती हो प्रसाद //८६//
तीर्थ नि प्रसाद / गऊ मातेचा तो / देण्यासाठी इथे / पुजारी बसलें //८७//
दोन फुटांवर / पावलांमागे त्या / त्रिशूल नि झेंडे / एकमेकांस ते //८८//
बांधून असे ते / असती ठेवले / रोवून असे ते / तिथेच जवळी //८९//
सिमेंटचे दोन / खांब ते मोठाले / तयावरी घंटा / मोठी टांगलेली //९०//
शिखरावरील हे / स्थान हे छोटेसे / जेमतेम तीस / माणसे बसती //९१//
आजूबाजूला ते / निसर्ग सौंदर्य / दिसें मनोहर / शिखरावरून //९२//
जुनागढचा हा / विस्तीर्ण भाग तो / दिसे परिसर / दूर दूरवर //९३//
प्रभास पाटण / दूर ते दिसतें / वेरावळचा तो / समुद्रही दिसें //९४//
सभोवताली ते / विलोभनीय हे / दृश्य हे पाहतां / भान हरपते //९५//
श्रीदत्त प्रभूंच्या / दिव्य चरणांचे / दर्शन घेऊन / खाली उतरतां //९६//
एका कड्यावर / दत्तधुनी आहे / शिखराजवळ / स्थान ते आहें //९७//
तेथे ते असती / प्रमुख महंत / आणि ते सेवक / अंदाजे दहा हो //९८//
प्रवासी भक्तांची / सोय ते करती / प्रसाद भोजन / चहा नि फराळ //९९//
अखंड जळत / चोवीस तास ती / दत्तधुनी अशी / प्रज्वलीत राहे //१००//
धुनीपासून ती पायवाट खाली / तिथे उतरतां / कमंडलू कुंड //१०१//
इथे कुंडावर / सूक्ष्म रूपाने ते / दत्तगुरु नित्य / स्नान हो करती //१०२//
नित्त्य स्नान होतां / साधनेंत दत्त / मग्न होती अशी / मिळते माहिती //१०३//
आणखी तिथे ती / बरीच स्थाने हो / पाहण्या सारखी / गिरनार इथे //१०४//
अतिदुर्गम ते / जाणे अवघड / शिखर नाम ते / अनुसूया असे //१०५//
महाकाली माता / मंदिर तसेच / गोमुखी गंगा / पांडव गुंफा नि //१०६//
जटाशंकर शिव / मुचकुंद गुंफा / भरतवन नि / भवनाथ शिव //१०७//
दुग्धेश्वर शिव / दामोदर कुंड / रेवती कुंड नि / शिलालेख आदी //१०८//
सम्राट अशोक / ह्याने जे कोरले / ऐतिहासिक ते / शिलालेख पहा //१०९//
दामोदर कुंड / इथे जवळीच / मोठा तो खडक / भैरवजप नामें //११०//
या खडकांवर / बसती महात्मे / जप करण्यांस / सूक्ष्म रूपानें ते //१११//
सूक्ष्म रूप असें / अवधूत स्वामी / कोणी ते सांगती / पाहिले असे हो //११२//
स्वानुभूतीपूर्ण / लेखांत वाचले / तेच हो कथिले / इथे अभंगात //११३//
नाथ मोक्षकिल्ला / नामें एक स्थान / तेही शिखर हे / इथेच पहावे //११४//
नाथ पंथियांना / जीवन शिव हे / दर्शन असे हो / झाले असे त्यांना //११५//
निरंजन अशी / समाधी घेऊन / विलीन सदेह / सूक्ष्मरूप झालें //११६//
प्रतीक आपलें / जाण्याचे म्हणून / अनेक चिमटे / तिथे ते रोवले //११७//
जड शरीराची / निरंजन अशी / समाधी घेऊन / दिव्य देही झालें //११८//
जगाच्या कल्याणा / भ्रमण करणे / हाच एकमेवं / उद्देश नाथांचा //११९//
म्हणून अशी हि / गिरनार भूमी / नाथ पंथियांची / भूमी सर्वश्रेष्ठ //१२०//
श्रीदत्तात्रेयांची / तपोभूमी अशी / गिरनार भूमी / पावन हे क्षेत्र //१२१//
नाथ व दत्तांच्या / भक्तांना आदेश / होतात येथुनी / असे गिरनार //१२२//
अनेक साधुंना / अनेक संतांना / झाले ते साक्षांत / श्री दत्त दर्शन //१२३//
कोणा कोणांस ते / झाले ते दर्शन / नांवे त्यांची अशी / पुराण काळांत //१२४//
राजा भर्तृहरी / राजा गोपीचंद / श्री गोरक्षनाथ / आदि साधु योगी //१२५//
आताच्या काळांत / साधु रघुनाथ / संत एकनाथ / स्वामी जनार्दन //१२६//
साधु नारायण / आदि ते अनेक / इंदूर इथले / नाना महाराज //१२७//
तराणेकर ते / आडनाव त्यांचे / प्रसाद छडीचा / दिला श्री दत्तानी //१२८//
उल्लेख त्यांच्याच / मार्तंड महिमा / नावाच्या पोथीत / केला असे तो //१२९//
अनंतकाळ ते / गिरनार इथे / राहणारे साधु / अजून आहेंत //१३०//
साधु नि महात्मे / आजही वास्तव्य / करून आहेंत / गिरनार इथे //१३१//
सभोवती तिथे / संतमहंतांचे / आखाडे आहेंत / आश्रम आहेत //१३२//
वन्यप्राण्यांचे ते / अभयारण्य हे / नंदन वनही / आहे सभोवती //१३३//
सिंहांची वसती / असे हे अरण्य / जगात प्रसिद्ध / गिरचे जंगल //१३४//
पूर्वीपासून तो / पुराण काळात / जो असे वर्णिला / अजून आहे तो //१३५//
विविध प्राचीन / संस्कृतीचा वसा / असा जो नटला / पहा गिरनार //१३६//
असा गिरनार / पाहून भाविक / साधक नि भक्त / सुखावून जातो //१३७//
आत्मशांति लाभ / खचितच होतो / एक म्हण अशी / आहे प्रचलीत //१३८//
जन्म जाति वाया / शंभर असे ते / जर ना होईल / गिरनार दर्शन //१३९//
आणि जो जाऊन / पाही गिरनार / पुनर्जन्म त्यांसी / नाही वारंवार //१४०//
जय हो जय हो / गिरी नारायण / जय हो जय हो / दत्त गिरनार //१४१//
संक्षिप्त असे हे / वर्णन लिहिलें / गिरनार ह्यांचे / असे अभंगांत //१४२//
प्रत्येक खंडांत / सहा अक्षरें ती / असा अभंग हा / म्हणती छंद हा //१४३//
आता मज इच्छा / आहे दर्शनाची / पादुका आपल्या / पहाव्या शिखरीं //१४४//
गिरनार तोही / पहावा म्हणुनी / परिक्रमा त्याची / वाटते करावी //१४५//
अनुसूया पुत्र / दत्तगुरु तेहो / स्मर्तृगामी दत्त / भक्तवत्सल तें //१४६//
आतां मज द्यावे / बळ दत्तगुरु / चढण्या गिरी तो / पाहण्या पादुका //१४७//
शके एकोणीश्शे / चाळीस सालांत / भाद्रपद कृष्ण / अष्टमी तिथीला //१४८//
सुरुवात केली / अभंग रचना / पूर्ण झाले आज / एकादशी तिथीं //१४९//
प्रेरणा दत्तांची / लेखणी सुरेश / तुम्हीचं लिहिलें / मी तो नाममात्र //१५०//
होतां लेखणींस / स्पर्श हा आपलां / धन्य धन्य झाला / रघुनाथसुत //१५१//
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
फक्त एकादशी / अष्टमी तिथीला / केले हे लेखन / दोनच दिवशीं //१५२//
दोन हजार नि / अठरा साली हे / मांस ऑकटोबर / झाले हे लेखन //१५३//
दोन आणि पाच / तारीख दिवशी / पूर्णत्वास गेले / अभंग लेखन //१५४//
अचानक अशी / झाली हि प्रेरणा / लिहवीते धनी / दत्तगुरु नाथ //१५५//   
लेखन - रघुनाथसुत (सुरेश पित्रे)चेंदणी ठाणे महाराष्ट्र 
लेखन काळ - २/१०/२०१८ आणि ५/१०/२०१८