शुक्रवार, १९ डिसेंबर, २०१४

कर्दळी वन एक अनुभूती, कि ब्रह्मांडनायक एक अनुभूती ?

कर्दळी वन एक अनुभूती, कि ब्रह्मांडनायक एक अनुभूती ?
गेल्याच महिन्यात नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आलो आणि महाजालावर कर्दळी वन हि ध्वनीचित्रफित पाहण्याचा योग आला , हे स्थान अत्त्यंत रमणीय आणि तुरळक मानवी वसती असलेले होते , असेच म्हणावे लागेल , कारण आता तिथे जाणाऱ्या भाविकांची संख्या '' कर्दळी वन एक अनुभूती '' हे पुस्तक प्रकाशित झाल्यापासुन वाढलेली आहे , हि ध्वनीचित्रफित उत्तम चित्रीकरण , श्रवणीय आवाजातील निवेदन , ह्या सर्वच गोष्टीनी छान अशीच बनली आहे. पण सर्वात शेवटी आणि सुरुवातीला तिथे एक खटकणारी आणि आध्यात्मिक क्षेत्रात घुसखोरी म्हणता येण्यासारखी गोष्ट आहे , ती म्हणजे इथे सरकारने आवश्यक सोयी सुविधा पुरवाव्यात ? तेव्हा माझे असे ठाम मत आहे कि तुम्ही जर खरे ईश्वर भक्त असाल तर ह्या मागणीला कोणीही पाठिंबा देऊ नये , कारण ! सोयी सुविधा वाढल्या कि सांड पाणी सोडणार कुठे ? म्हणजे मग ते सखल भागात खाली कृष्णा नदीत सोडणार ना ? कारण सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प वगैरे भारत देशात तरी अजून स्वप्नवत आहेत , आणि झाले तरी ते भ्रष्टाचारामुळे कितपत कार्यरत राहतील हे माहित नाही ? हे मी नर्मदा परिक्रमेत सुद्धा प्रत्यक्ष पाहुन आलो , ओम्कारेश्वरला एकीकडे 
गोमुखातुन नर्मदा वाहते , ते तिथेच थोड्या अंतरावर वरच्या नागरी वस्तीचे सांडपाणी 
थेट नर्मदा नदीत सोडले आहे , हे पाहून चीड येते. नदीचे , स्थानाचे पावित्र्य जपणे हि खरी 
भक्ती असावी. 
१) तसे म्हटले तर हे पुस्तक प्रकाशित झाल्यापासुनच लोकांचा त्या पवित्र वास्तुत वाढलेला वावर.
तो लोकांचा ओघ आता आहे इतपतच सिमीत ठेवावा, तो वाढू नये. 
२) जिथे मूर्ती वगैरे काहीहि नव्हते , तिथे आज मूर्ती स्थापना झाली आहे , हळु हळु सोयी सुविधा, 
ध्यान धारणा केंद्र , मठ / मंदिर उभारणीच्या नावाखाली तिथली झाडे आणि पर्यावरण ह्यांचा नाश ,
आणि वरकढी म्हणजे ''इतकी जंगले आहेत थोडे तोडले तर काय झाले'' असे हळूच म्हणणाऱ्या महाभागांचे सूर. मठ,मंदिर झाले कि शहरी जीवन जगणारे त्यांना सुटी कमी पडते म्हणून आणि वृद्धाना सोयीचे म्हणून चार दिवसाची यात्रा एक दिवसात होण्यासाठी त्या स्थानावर पोचण्यासाठी रस्ता पाहिजे असे म्हणतील , बोटीतून नदी पार करण्याऐवजी कृष्णा नदीवर वाहनांसाठी पूल पाहिजे , भक्तांची गर्दी वाढली कि मग भक्त निवास बांधणे अशा मागण्या , मग हे सर्व सांभाळायला ट्रस्ट , पुढच्या बाजारी करण होणाऱ्या गोष्टींची हि नांदी आहे , आणि ह्या सर्व सावळ्या गोंधळात खऱ्या भक्ती भावाला मूठमाती , असे चित्र जे इतर काही तीर्थ क्षेत्रांचे झाले आहे , तसे व्हायला वेळ लागणार नाही. 
ह्या ध्वनी चित्रफितीत सुरुवातीलाच उल्लेख आहे कि जे तिथे आत्ता व्यवस्था पाहतात तिथे 
वन विभागाने कारवाई करून त्यांचे तात्पुरते निवासी बांधकाम पाडले होते, चिंचू जमातीचे तिथले मूळ रहिवासी आजही धनुष्य बाणाने शिकार करून , शेती करून स्वतःची उपजीविका करतात . 
ते स्थान तशाच अवस्थेत मूर्ती स्वरूप मानून जपले पाहिजे , 
३) स्वामींचे वाक्य '' मै गया नही, झिंदा हु '' ह्या वाक्याचा अर्थ जर अशा तर्हेने लावला कि 
ईश्वर सर्व चराचर व्यापून आहे, फक्त आपण भक्त प्रल्हाद बनण्याची गरज आहे , 
भक्त प्रल्हाद होण्यासाठी काय आवश्यक आहे ते करावे , उगाच कापराच्या मशाली तिथे 
पेटवून त्या प्राचीन निसर्ग निर्मित गुहा काजळी युक्त करण्याची गरज आहे का ?
४) तिथे स्वामींचे एक पाऊल उमटलेले आहे असे दाखविले आहे , ते पुढल्या सर्व भक्तांना 
पहायला मिळावे असे वाटत असेल तर त्याला पाणी वाहणे जरुरी नाही , आत्ता पाणी वाहिले  
पुढे दुध , मध ,तूप असे अभिषेक सुरुवात होऊन ते पाऊल ओळखता येत नाही 
असे व्हायला वेळ लागणार नाही ,
५) भक्तांची गर्दी वाढली कि मग व्ही आय पीं ची पैसे देऊन वेगळी रांग , मी नर्मदा परिक्रमेला 
जायच्या आधी गाणगापुर इथे दर्शनाला गेलो होतो , उद्देश हाच होता कि परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या समाधी शताब्दी वर्षा निमित्त ह्या स्थानांना भेट देणे गाणगापुर इथे टुरिस्ट बसने गेलो होतो , पण तिथला वाईट अनुभव गाठीशी होता ,  
ब्राह्मण अक्षरशः लोकांना पुढे ढकलत होते , विशेष रांगेसाठी पैसे देऊन प्रवेश देतो , असे म्हणताना ह्यांना काहीच भीड कशी वाटत नाही असा प्रश्न मला पडला , देवाच्या दरबारात देवाचाच बाजार ? 
शेवटी मनस्वी चीड येऊन मी त्यांना म्हटले '' अशा बाजारी करणाची शिक्षा भोगावी लागेल '' हे श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे वाक्य तुम्ही विसरलात का ?
शेवटी त्या धक्का गर्दीतून बाहेर आल्यावर मी बाहेरच्या ब्राह्मणांना म्हटले कि ह्यांना नीट शेवट पर्यंत रांग बनविता येत नाही का ? आधी रांग आहे तशीच जर शेवटपर्यंत लोखंडी खांब लावुन जर गर्दी नियंत्रणात ठेवली तर दर्शन धक्क्याविना सहज शक्य आहे , पण ते असेच आहे पाणी टंचाई ठेवली कि टॅंकरचा व्यवसाय तेजीत , घरांची टंचाई असली की उच्च भावाने बँकांचा / घर व्यवसायिकांचा सर्व संबंधितांचा उद्योग तेजीत. तसे भाविकांची धक्का धक्की तशीच राहिली कि विशेष दराने व्ही आय पीं रांगेचा उद्योग तेजीत, तरी बाकी देवस्थानांपेक्षा इथे बाजारीकरण कमी आहे असे ऐकुन होतो ते काही पटले नाही. 
६) त्या स्थानावर श्री मार्कंडेय ऋषी, श्री आद्द्य शंकराचार्य , श्री अक्क महादेवी, श्री टेंबे स्वामी इतक्या थोर विभूती तिथे पायी पोचल्या किंवा त्या स्थानावर त्यांनी अनुष्ठान , उपासना केली , त्यांनी तिथे '' कर्दळी वन एक अनुभूती, ह्या बरोबरच ''ब्रह्मांडनायक एक अनुभूती'' असाही अनुभव तिथे घेतला असावा असे आपण म्हणू शकतो. 
तर अशाच उपासना आज जे खरे साधक / भक्त त्या आध्यात्मिक पातळीचे आहेत त्यांच्यासाठी हे स्थान राखीव असावे असे मला वाटते . असे म्हटल्यावर एक महाभाग मला म्हणाले '' कशाला ते जातील दुसरीकडे , बरीच जंगले आहेत , म्हणजे आणखी अशी धार्मिक स्थळे वाढतील , हिंदु धर्म वाढायला नको का? म्हणून मी पुस्तक विकत घेतले आहे , कर्दळी वनात जाऊन पण आलो ? '' मी कपाळाला हात लावला , अशी भावना ठेवुन कोणी तिकडे जात असेल तर कसे होणार ? '' विश्व स्वधर्म सूर्ये पाहो '' असे म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर माउलीना असा धर्म अपेक्षित होता का ? 
जे समाजासाठी चांगले ते म्हणजे धर्म आणि समाजासाठी जे वाईट तो अधर्म इतकी सोपी व्याख्या 
असावी, धर्म शब्दाच्या आधी कोणत्या नावाचा उल्लेखच कशाला हवा , आज पर्यंत सर्व संतानी 
अधर्म सोडून धर्माने वागा म्हणून सांगितले त्याचा अर्थ हाच तर आहे ना ?
आणि म्हणून ह्या लेखाचे जे शिर्षक आहे ''कर्दळी वन एक अनुभूती, कि ब्रह्मांडनायक एक अनुभूती ?'' ह्या विषयी मला असे म्हणावेसे वाटते कि ज्याला अध्यात्म वाटेने जायचे आहे त्याला ''ब्रह्मांडनायक एक अनुभूती'' असे म्हणावेसे वाटले पाहिजे , त्यासाठी आपला भाव असा व्हायला पाहिजे कि सर्व चराचर ईश्वर मय आहे , पण तो भाव मात्र अशा स्थानावर गेल्यावर जास्त जागृत होतो आणि त्या भावात ज्यांना कायमचे रममाण व्हायचे आहे अशासाठी हि स्थाने प्रामुख्याने आहेत. मग सर्व चराचर विश्व ईश्वरमय आहे असा भाव पक्का झाला कि मग ''मी'' त्याहुन वेगळा नाही हा भावही जागृत व्हायला लागतो , माझ्यासकट सर्व चराचर विश्व ईश्वरमय आहे अशा भावाचे मनन चिंतन सुरु होते , मग आपले आपल्यालाच हसु येते कि मी ज्याला देवळात जाऊन पाहतो आहे , पुजतो आहे तो जर अशा भावनेतुन आपण पाहायला शिकलो तर त्या सर्व गोष्टी पुजा,अर्चा,भजन, जप हळु हळु गळून पडतात , आणि मग ते केले तरी तोच भाव आहे आणि नाही केले तरी तोच भाव आहे हे जेव्हा साधले जाते ती ''भक्त '' हि अवस्था असावी असे मला वाटते , अशा भावापासुन जो वेगळा / विभक्त होत नाही तो खरा भक्त. पण आज काल काय जो उठतो तो म्हणतो मी स्वामींचा भक्त , मुलगा गणपतीचा भक्त , बायको देवीची भक्त . भक्त हा शब्द कोणीही उठून खिशातील दहा रुपयाची नोट पटकन काढावी असा इतका सोपा आहे का ? 
भक्त हि संज्ञा ''चणे खावे लोखंडाचे'' अशी कठीण आहे हे आपल्यासमोर अनेक थोर संत मंडळींनी आपल्या जीवन चरीत्रातुन समोर ठेवले आहे. पण भक्त प्रल्हाद निर्माण व्हायला आणि अशा भक्ताचे दर्शन आपल्याला व्हायला युगे लोटावी लागतात. 
त्या स्थानावर भाऊ गर्दी करणाऱ्या भाविकांपैकी किती जण एकटे तिथे राहायला तयार आहेत ?
जो एकता राहायला तयार होईल तेव्हा पाटुकले साहेबांनी ध्वनिफितीत म्हटल्याप्रमाणे करोडोतून एखदी व्यक्ती तिथे जाऊ शकते हे वाक्य त्या व्यक्तीला सार्थ ठरू शकते , नाहीतर हे शिष्याने , विद्यार्थ्याने उठून शिक्षकाच्या खुर्चीत बसल्यासारखे होईल नाही का ?
कर्दळी वन हे स्थान खऱ्या साधकासाठी राखुन ठेवावे , उगाच तिथे सर्वांनी गर्दी करू नये .
अर्थात हे सांगून किती लोकं हे मानतील ह्याची शाश्वती नाही हे आत्ता असलेल्या 
बाकी तीर्थ स्थानावरून कळतेच आहे . शेवटी खऱ्या साधकाला लोकं संसारात स्वस्थ 
बसू देत नाहीत आणि तो अशा निर्जन ठिकाणी गेला तर तिथेही लोक भाऊगर्दी करतात . 
शेवटी अशा साधकांना त्याचा त्रास होऊन त्यांना अन्य जंगलात किंवा निर्जन स्थानात आसरा घ्यावा लागेल नाही का ?  
थोडक्यात काय तर ''कर्दळी वन एक अनुभूती'' हि आत्ता जशी लोकांना अनुभवायला मिळते आहे 
तशीच राहावी त्याचे जास्त शहरीकरण आणि पुढे जाऊन बाजारीकरण होऊ देऊ नये आणि माझ्यासकट सर्वाना ''ब्रह्मांडनायक एक अनुभूती'' हेही अनुभवायला मिळावे हीच श्री चरणी इच्छा. 
सुरेश पित्रे , ठाणे 
9004230409

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा