|| श्री गाडगेबाबा महाराज कथा सार स्तोत्र || | |
|| कर्मयोगी, वैराग्यमूर्ती, अनाथांचा नाथ, व्रतस्थ || || श्रीमत सदगुरू संत, गाडगे बाबा महाराज कि जय || | |
विदर्भात जिल्हा अमरावती | महाशिवरात्रीस शेड गावी | आई सखुबाई,वडील झींगराजीचा | बालक डेबू जन्मला ||१|| वडिलांचा मृत्यू लवकर झाला | डेबू मामांच्या घरी राहिला | दापुरा गावी मोठा झाला | गुराख्याचे काम करुनी ||२|| डेबुचा बालविवाह झाला जरी | मामा डेबुचे झाले कर्ज बाजारी | गहाण पडली सावकार दरबारी | शेतजमीन मामांची ||३|| सावकार मतलबी होता हुशार | खटला चालविला जमिनीवर | तडजोड करुनी काही एकर | जमीन लाटली सावकाराने ||४|| नंतर एक प्रसंग घडला | डेबूला एक साधू भेटला | घरदार संसार डेबूने सोडला | डेबू झाला बैरागी ||५|| आकाश हेच झाले छप्पर | पृथ्वी हेच बनले घर | डोक्यावर गाडग्याचे खापर | वैराग्यमूर्ती गाडगेबाबा ||६|| आधी काम झाडलोट करणे | मग खापरीत भिक्षा मागणे | भूकेपुरतेच अन्न घेणे | चून भाजी अर्धी भाकर ||७|| गोपालागोपाला देवकीनंदन गोपाला | हाच मंत्र त्यांनी जपला | चिंध्यांचाच सदरा घातला | काठी खापर हातामधे ||८|| स्वतः कोरडी भाकर खाती | जनावरास खाऊ घालती | भुकेल्या जीवाचे पोट भरती | स्वतःचा घास देऊन ||९|| स्वतः झाडू हाती घेतला | रस्ता झाडून स्वच्छ केला | स्वच्छतेचा संदेश दिला | अविरत अहोरात्र ||१०|| सकाळी गावं स्वच्छ करणे | सांज सकाळ भिक्षा मागणे | रात्री कीर्तन प्रबोधन करणे | व्रत हे गाडगे बाबांचे ||११|| बकरे कोंबडे कापू नका | मुक्या प्राण्यास मारू नका | अंधश्रद्धा ठेऊ नका | समजाविती गावक-यांना ||१२|| तंबाखू तुम्ही खाऊ नका | दारूला स्पर्श करू नका | व्यसनात तुम्ही गुंतू नका | सांगती गाडगेबाबा ||१३|| | अनेक बांधल्या धर्मशाळा | मुलांसाठी बालवाडी शाळा | गाई गुरांसाठी गोशाळा | बांधल्या जनश्रमदानामधुनी ||१४|| अनेक बांधली इस्पितळे | पाण्यासाठी पाणपोई तळे | बांधू नका माझी देऊळे | खडसाविले लोकांना ||१५|| बाबांनो एकवेळ उपाशी रहा | पण मुलाबाळांस शिकवा | घर गावं स्वच्छ ठेवा | हाच मंत्र बाबांचा ||१६|| आधी सोडावी व्यसंनाधीनता | मग करावी ग्रामस्वच्छता | रुजवा बाल प्रौढ साक्षरता | त्रिसूत्री गाडगे बाबांची ||१७|| जे का रंजले गांजले | त्यासी म्हणे जो आपुले | हे तत्व ज्यांनी जपले | ते श्री संत गाडगे बाबा ||१८|| ग्रामस्वच्छता करीत राहिले | गावोगावी फिरत राहिले | जनजागरण करीत राहिले | व्रतस्थ कर्मयोगी ||१९|| चंदनापरी झिजविली काया | अनाथावारी केली माया | दिनदुबळ्यास दिली छाया | आश्रमशाळा बांधुनी ||२०|| जनसेवा हेच मानिले तत्व | स्वच्छतेचे सांगितले महत्व | कर्मयोगाने मिळाले अमरत्व | श्री संत गाडगे बाबांना ||२१|| अखेर वय वर्षे पंच्याहत्तरीत | प्रकृती गेली खालावत | बाबांची मालवली प्राणज्योत | रात्री सुमारे बारा वाजता ||२२|| पहाड तो दुःखाचा कोसळला | भक्तांनी हंबरडा फोडला | आसमंत सारा दणाणून गेला | पेठी नदीच्या पुलाजवळ ||२३|| गाडगेबाबांचा घेऊ वसा | चालवू त्यांचा पुढे वारसा | संदेश घेऊ गाडगेबाबांचा | श्रमदान जनसेवेचा ||२४|| गाडगेबाबा सदगुरू मूर्ती | सर्वदूर ज्यांची पसरली कीर्ती | चला गाऊ त्यांची महती | समाजसेवा करुनी ||२५|| || ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः || || शुभम भवतु || शुभम भवतु || शुभम भवतु || |
प्रेषक - सुरेश रघुनाथ पित्रे. पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड, लोअर चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१ | |
|| कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ | तेरा कर्म करने में ही अधिकार है, उसके फलों में कभी नहीं । इसलिए तू कर्मों के फल हेतु मत हो तथा तेरी कर्म न करने में भी आसक्ति न हो । |
हे स्तोत्र दादर येथून निघणा-या "भक्तीसंगम" मार्च 2011ह्या मासिकात प्रकाशित झाले आहे.
PRESS CTRL KEY AND SCROLL UP THE MIDDLE BUTTON OF MOUSE TO SEE ENLARGED VIEW.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा