मंगळवार, १२ जून, २०१८

प्रयाग माधव अभंग
आरंभी वंदितो / ॐकार गणेश / मंगल करितो / सुखकर्ता //
प्रयाग माधव / अमृत रुपी हा करुणेचा सागर / महाविष्णु //
आर्त लोकांच्या जो / हाकेला धावतो / शरणागताचा / सखा बंधु //
ऐका त्याची कथा / इथे कसा आला / देव हा तुमचा / कोरगावी //
कोणे एके काळी / गोवा ह्या राज्यात / कोरगाव इथे / पित्रे वंशी // 
जन्मला होता हो / वासिष्ठ गोत्राचा / पित्रे ह्या वंशाचा / एक कोणी / 
एक तो पूर्वज / नागू दिवाकर / पित्रे कुळातील / एक भक्त //
जरी होता नागू / कष्टाने पिडला / तरी तो निघाला / काशी क्षेत्री //
आजारी जरी तो / तरीही निघाला / निश्चय करुनी / यात्रेसाठी //
घरून आपल्या / नागू तो निघाला / काशीच्या यात्रेला / तीर्थक्षेत्री //
प्रयाग नामक / तीर्थ क्षेत्रामधे / रात्री स्वप्नामधे / आला देव /
जगदीश म्हणे / आदेश हा माझा / सकाळी मिळेल / वस्तु जी ती //
घेऊन तू जारे / लगेच बरं का / स्वतःच्या तू गावी / त्वरेने हो //
आदेशाप्रमाणे / घडली घटना / स्वप्न तेहो झाले / तिथे स-त्य /
सकाळी मिळाले / एक ते संपूट / मूर्ती त्यात होती / एक छान //
हाती शंख चक्र / कमळ नि गदा / चतुर्हस्त मूर्ती / महाविष्णु //
भक्त मनोरथ / पूर्ण ती करती / अशी हो पाऊले / देवाची ती //
नागू दिवाकर / पित्रे तो ब्राह्मण / घेऊन तो आला / मूर्ती गावी //
त्याने हो बांधले / सुंदर ते छान / कोरगावी देऊळ / एक छोटे //
मुहूर्त पाहुनी / मूर्ती हो स्थापिली / अन्य मूर्ती सवे / प्रतिष्ठा ती  //
भक्तांच्या मनीच्या / शुभ कामना ज्या / फलद्रूप होती / दर्शनाने //
मूर्ती सापडली / प्रयाग ह्या तीर्थी / म्हणून नांव ते / असे आहे //
प्रयाग माधव / पित्रे कुल देव / कोरगावी आहे / भक्तांसाठी //
झाला सुविख्यात / ह्याच हो नावाने / प्रयाग माधव / नाव छान //
तेव्हापासून ते / पित्रे वंशज हे / सेवेत आसक्त / माधवाच्या //
दुरून येती ते / दर्शनांस त्याच्या / माघ पौर्णिमेस / उत्सव तो //
माधवाच्या कृपे / चिन्तामुक्त होवो / प्रार्थना करती / इथे सर्व //
कुशल राहू दे / त्याच्या पायी येता / सदिच्छा त्या पूर्ण / होती इथे //
वचन देउनी / अलिप्त असे तो / प्रयाग माधव / कुलदेव //
मूळ ती संस्कृत / आरति लिहिली / मूळ ते कवी हो / थत्ते शास्त्री //
जतन केली ती / अनंत केशव / पित्रे बडोद्याचे / 
त्याचा अनुवाद / मराठीत केला / अभंग वृत्तात / सुरेशाने //
(इथपर्यंत आहे ते वर्णन संस्कृत आरती मधे आहे त्याचा साधारण अनुवाद 
, त्यापुढील वर्णन हे मूर्तीचे , मंदिराचे आणि दरवर्षी होत असलेल्या उत्सवाचे आहे)
गाभाऱ्या बाहेर / अन्य मूर्ती त्याही / स्थापन त्या केल्या / पहा तुम्ही //
समोरून पहा  / डाव्या त्या बाजुला / गणेशाची मूर्ती / बसविली //
तशीच दुसरी  / उजव्या बाजूला / शिवपिंडी एक  / स्थापियली // 
गाभाऱ्यात आंत / मुख्य मूर्ती आहे / मधोमध ती हो / माधवाची //
उजव्या बाजूला / देवीची ती मूर्ती / कोणी म्हणे दुर्गा / आहे ती हो //
अशी हि रचना / देवळाची आहे / कोरगावी जातां / पहा तुम्ही //
दगडाचे उत्तम / मंदिर भक्कम / प्रवेशद्वार ते / कमानीचे //
गोलाकृती खांब / दगडी ते भव्य / तयांसी जोडती / कमानी त्या //
मुख्य ती मूर्ती / वर्णन करितो / काळ्या पाषाणात / कोरली ती //
मधे तो माधव / सभोवती छोटे / दशावतार जे / आहेत ते //
दशावतार हे / मूर्तीत दिसती / म्हणून हा विष्णू / जाणा तुम्ही //
छान प्रभावळ / पितळी असे हो / मूर्तीच्या भोवती / सुंदर ती // 
पाच नाग फणे / त्यावरी दिसती / लख्ख चमकते / प्रभावळ //
सुंदर साजिरी / पाषाणाची मूर्ती / माघ पौर्णिमेला / उत्सव रे //
प्रयाग इथे हि / सापडली मूर्ती / प्रयाग माधव / नांव झाले //
पित्रे वंशीय ते / जमती सगळी / उत्सव करती / देवाचा तो //
प्रयाग माधवा / कृपा करी आता / हेच रे मागणे / तुझ्या पायी //
दुर्गा देवी तुला / तशीच प्रार्थना / कुलदेवी तू गं / मानली ती //
पित्रे कुलदेवी / कोण ती संभ्रम / कोरगांवात जी / आहे ती का //
कोण म्हणे दुर्गा / विंध्यवासिनी ती / नक्की ना माहित / कुलदेवी //
माधवेश्वरी ह्या / नावाने एक ती / प्रयाग ठिकाणी / एक देवी //
शंकराचार्य ते / लिहून गेले ते / एक आहे स्तोत्र / त्यात पहा //
माधवाची ती का / माधवेश्वरी हो / नाव आहे दिले / स्तोत्र पहा // 
असो तिचा आता / आठव तो केला / मूळ जगदंबा / नमितो मी // 
पार्वती ती मूळ / शक्तिपीठे खूप / माहित आहे ती / कथा आहे //
रघुनाथ पुत्र / सुरेशाने केले / माधव कथेचे / वर्णन हे  //
दोन हजार नि / अठरा साली हे / लिहिले वर्णन / अभंगात //
अधिक महिना / शुद्ध चतुर्दशी / छोटे हे स्तवन / आज झाले // 
गायन हो ह्याचे / करा हो तुम्ही हो / माघ पौर्णिमेला / प्रतिवर्षी // 

हे कोणी लिहिले , तसेच माझ्या वडिलांचा वाढदिवस त्याच तिथीचा  
वगैरे वर्णन पुढे केले आहे 
पहिल्या तीन त्या / प्रत्येक खंडात / सहा अक्षरे ती / पाहिजेत //
शेवटचा खंड / चार अक्षरांचा / असा तो अभंग / छंद जाणा //
अभंग छंदात / केले हे वर्णन / प्रयाग माधव / कथेचे हे //
योगा योग कसा / पहा बघा आहे / माझेही वडील / त्यांचा जन्म //
हीच तिथी आहे / माघ पौर्णिमा ती / त्यांचाही असे तो / जन्म दिन //
सन एकोणीश्शे / साल त्रेचाळीस / जन्म दिवस तो / वडिलांचा //
रघुनाथ पित्रे / ठाण्याचे निवासी / त्यांचाच मी पुत्र / वर्णितो हे //   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा