मंगळवार, १२ जून, २०१८

एकदा श्री आद्य शंकराचार्य काशीमधे असताना त्यांनी गंगेत स्नान करताना पाहिले एक 
वृद्ध गृहस्थ ''  डुकृञ् करणे '' हे संस्कृत व्याकरणातील सूत्र घोकंपट्टी करून पाठ करत 
होते , त्या वृद्ध गृहस्थाकडे पाहून आचार्यांनी तळमळीने त्यांना जो उपदेश केला 
तो म्हणजेच '' चर्पटपञ्जरिकास्तोत्रम् '' अशा छान स्तोत्राचे गद्द्य भाषांतरावरून 
मराठी काव्य रूपांतर / अभंग करण्याचा छोटासा प्रयत्न.  
श्री आद्य शंकराचार्यांच्या चर्पटपंजरिका स्तोत्राचे 
मराठी काव्य रूपांतर .  - अभंग - छंद - ६/६/६/४
चर्पटपञ्जरिकास्तोत्रम् / मोहमुद्गरस्तोत्रम् 
दिवस सरोनि / संध्या नि रात्र / वसंत शिशिर / पुन्हा पुन्हा //
खेळ हा काळाचा / जीवन सरते / तरी ना सुटे ती / आशा तुझी //
आशा दावी स्वप्न / मिथ्याच ते असे / त्यात मन गुंते / का रे तुझे //
भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भ्रांतमती //धृ//
ठाके मरण ते / समोरचि तेव्हा / घोकंपट्टी तुझी / काय करी //धृ// 
मृ-त्यु पुढे तो  / उभा रे ठाकतां / डुकृञ् करणे / काय करी // धृ// 
मरण पुढे ते / उभे हो ठाकता / नाही उपयोग / डुकृञ् ते // धृ// //१//
आग ती समोर / सूर्य तो रे पाठी / हनुवटी ती रे / गुडघ्यांत //
भिक्षा ती मागण्या / केवळ ओंजळ / विश्राम तो आहे / झाडाखाली //
उदासवाणी ती / अशी सरे रात / आशा ती तरीही / सुटेना ती //
भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भ्रांतमती //२//
जोवर मिळतो / पैसा नि अडका / तोवर ते नाते / घट्ट असे //
वीण रे नात्याची / उसवत जाई / जेव्हा ती आवक / मंदावते //
क्षीण तो होता रे / देह तो जेव्हा रे / विचारी ना कोणी / घरातले //
भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भ्रांतमती //३//
डोक्यावरी जटा / कोणी त्या बांधती / किंवा कोणी करी / मुंडन ते //
वस्त्रे भगवी ती / संन्यासाची घाली / सोंग ते करिशी / किती किती //
पोटाची खळगी / भरणे म्हणून / पाहसी सारे का / काणाडोळा //
भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भ्रांतमती //४//
मनापासून ती / भगवद्गीता / थोडी जरि तु रे / वाचली का //
गंगेचे जल ते / प्राशन तू केले / पूजिला का हरी / मनोभावे //
यमही मग तो / कचरेल मनी / जर तू जपला / हरि हरि //
भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भ्रांतमती //५//
शरीर म्हातारे / मानही हलते / बोळके तोंडाचे / दाताविना //
थरथरणाऱ्या / हातामधे काठी / पायामधे नाही / जोर तरी //
केस ते पिकले / टक्कल पडले / तरी ओढ किती / जगण्याची //
भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भ्रांतमती //६//
बालपण ते रे / खेळण्यात गेले / तरुणपण ते / वाया गेले //
तरुणाई गेली / म्हातारपणी रे / चिंता वार्धक्याची / छळते रे //
सरते आयुष्य / तरीही ती नाही / आस ती ज्ञानाची / का रे तुला // 
भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भ्रांतमती //७//
पुन्हा ते जन्मणे / पुन्हा ते मरणे / कितीवेळा खेळ / जन्मोजन्मी //
पुन्हा ते झोपणे / आईच्या उदरी / जन्म मृ-त्यु तो रे / कितीवेळा //
अवघड फार / भवसागर हा / पार करि मज / कृष्णा तूच //
भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भ्रांतमती //८//
पुन्हा तीच रात्र  / पुन्हा तो दिवस / पुन्हा तो सप्ताह / पुन्हा पक्ष //
पुन्हा तोच मास / पुन्हा तेच वर्ष / परत अयन / संवत्सर //
असा सरे काळ / तरी ना शमते / आशा ती तरीही / कशी जीवा //
भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भ्रांतमती //९//
वय सरल्यावर / तळे आटले ते / आता नाही काम  / उपयोगी //
पैसे ते संपतां / कसले जीवन / निज परिवार / व्यर्थ आतां //
ज्ञान हे मिळाले / भवसागराचे / आता संसाराचे / भय का रे //
भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भ्रांतमती //१०//
नारी देहावर / भाळून चिंतन / सतत मनांत / चालले ते //
ज्याचा तुला मोह / पडला असे ते / मिथ्या जाण हे रे / शरीर ते //  
रक्त मांस हाडे / विकाराचे घर / विचार मनाला / सत्य काय //
भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भ्रांतमती //११//
कोण मी आणिक / कुठून आलो मी / कोण माता पिता / संसारात //
जणू स्वप्नवत / मोहमय जग / स्वप्न ते संपतां / स-त्य कळे //
नि-त्य नूतन ती / माया मोहमयी / अवस्था बदल / नित्य चाले //
भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भ्रांतमती //१२//
भगवद्गीता / रोज ती म्हणावी / हजार नावे ती / रोज म्हणा //
चित्ती आठवावे / भव्य नि सुंदर / रूप मनोहर / विराट ते //
धन नि संपत्ती / गरिबांस देई / सज्जनांची तू रे / कास धरी //
भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भ्रांतमती //१३//
जोवरी देही या / प्राण नांदतसे / तोवरी सारे ते / अलबेल //
देहांत प्राण तो / जोवरी संचरे / तोवरी घरचे / विचारती //
प्राण तो सोडितां / निर्जीव ती काया / पत्नी व घरचे / घाबरती //
भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भ्रांतमती //१४//
सुख वाटे जीवां / संगती रे स्त्रीची / जरी रोगी झाला / तुझा देह //
टेकती गुडघे / मरणा पुढती / सुटका ह्यातून / होत नाही //
तरी ना सुटते / दुष्कर्म तुझे ते / शरीर पापांत / रत होते //
भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भ्रांतमती //१५// 
चिंध्या त्या जोडून / गोधडी शिवसी / वर्ज हे तुला रे / पाप पुण्य //
मी तू सारे विश्व / खोटे हे म्हणसी / मिथ्या मोहमाया / सृष्टी सारी //
मग शोक का रे / वैराग्याचे ढोंग / खरा तोची मनीं / जाण हरि //  
भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भ्रांतमती //१६//
गंगा सागरी ते / वारी हे करिती / व्रत आचरूनी / दाने देती //
ज्ञानाविण सारे / हेच हो करती / नाही ज्ञान मीच / ब्रह्म स-त्य //
सारे ते करुनी / शतजन्म घेती / नाही नाही मुक्ती / ज्ञानाविणं //  
भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भ्रांतमती //
ठाके मरण ते / समोरीच तेव्हा / घोकंपट्टी तुझी / काय करी // 
मृ-त्यु पुढे तो  / उभा रे ठाकतां / डुकृञ् करणे / काय करी //१७//
मूळ ते संस्कृत / चर्पट पंजरि / आदि आचार्यांचे / शंकरांचे // 
भक्त जनांना तो / कळण्या सुलभ / माय मराठीत / रूपांतर //
गद्य अनुवाद / त्यावरून केले / काव्य रूपांतर / सोपे सोपे // 
रघुनाथ पुत्र / सुरेशाने केला / सहज सोपा रे / अभंग हा  //
दोन हजार नि / अठरा साली हा / लिहिला अभंग / सोमवारी //
अधिक महिना / कृष्ण त्रयोदशी / छोटे हे स्तवन / आज झाले //१८// 
कवी / लेखक - सुरेश रघुनाथ पित्रे , चेंदणी , ठाणे - पश्चिम - ४०० ६०१
११/०६/२०१८ - सोमवार - रात्री ११ वाजता लिहून पूर्ण झाले 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा