शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०१६

।। पाचशेची कथा । हजाराची व्यथा ।। - ban on 500 and 1000 old indian currency from 8th November 2016

भारतात  नोव्हेंबर २०१६ च्या रात्रीपासून जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटांवर 
सरकारने बंदी घातली तेव्हापासुन संपूर्ण देशात जो गोंधळ उडाला आहे त्याचे 
४० कडव्यात केलेले वर्णन. 
   ।। पाचशेची कथा  हजाराची व्यथा ।।  
जुन्या नोटांवर आली आहे बंदी  पाचशे हजार नोटांवर बंदी   
तयाने आली बाजारात मंदी  बाजार सर्वत्र थंडावला।।१।।
दिवाळीचा संपला लखलखाट  शंभरच्या नोटांचा खडखडाट 
पाचशे-हजारचाही खडखडाट  पैशाची उलाढाल थंड झाली ।।२।।
खोट्या नोटांची वाट लागली  काश्मीर मधे दगडफेक थांबली 
खोट्या नोटांची रद्दीच झाली  नोटा घुसखोरांचे मोडले कंबरडे ।।३।।
पण ते काय गप्प बसतील ?  खोट्या नोटा नव्याने छापतील 
मग सरकार काय करील ?  चोर पोलीस खेळ संपत नाही ।।४।।
कोणी व्यापारी कर चुकविती  कोणी नोटा भींतीत दडविती 
काळा पैसा असा जमविती  देशद्रोही धनदांडगे लोकं काही  ।।५।।
जेव्हा नोटांवर बंदी आली तेव्हा रात्रभर सोन्याची खरेदी झाली 
पॅन कार्ड नोंदणी झाली का नाही  सरकार म्हणे आह्मी तपासू ।।६।।
एखादा सरकारी लाच घेतो  कोणी राजकारणी नोटा वाटतो 
कोणी रोखीने पैसा मागतो  असा साठतो काळा पैसा ।।७।।
काळा पैसा पडून सडतो  उलाढालीपासून लांब राहतो 
कोणी नोटा गंगेत टाकतो  वाटते त्याला धुतले पाप ।।८।।
खोट्या नोटा कोणी छापतो  अतिरेक्यांना पैसा मिळतो 
खोटा पैसा बाजारात पसरतो  कोसळते अर्थ व्यवस्था ।।९।।
कधी आहे पाणी टंचाई  कधी असते विजेची टंचाई 
आता नव्या नोटांची टंचाई  बोंब सध्या भारत देशांत ।।१०।।
रोखीचे व्यवहार थंडावले  ऑनलाईन व्यवहार वाढले 
पण गरीब काही उपाशी राहिले  ज्यांचे आहे हातावर पोट ।।११।।
एटीएमवर झाली तोबा गर्दी  बँकेतही झाली खूप गर्दी 
पोस्टातही झाली तुफान गर्दी  नोटा बदलण्यासाठी ।।१२।।
कालच बातमी वाचली  पोस्टातली रक्कम कोणी लुटली 
कोणी नोटांची गड्डी जाळली  नोटांची चर्चा सगळीकडे ।।१३।।
नोटांसाठी लागली घरघर  रांगेत कोणाला येते चक्कर 
पडापडीधडपडलागते ठोकर  तेव्हा नवीन नोट मिळते ।।१४।।
पाचशेच्या बदल्यात चारशे  हजारच्या बदल्यात सातशे 
नोट घेऊंनी जुनी पाचशे  चालला नोटांचा काळा बाजार ।।१५।।
नोटा मिळत नाहीत लवकर  कोणाला उन्हात येते चक्कर 
रांग सरकत नाही भराभर   रांगेचानोटांचा त्रास संपेना ।।१६।।
उत्सवात बँजोचा कल्लोळ  शहरांत वाहनांचा कल्लोळ 
आता सर्वत्र चलन कल्लोळ  चालला भारत देशामधे ।।१७।।
कोणाचे लग्न सोहळे खोळंबले   आजाऱ्याचे उपचार रखडले 
कोणाचे पर्यटन रद्द झाले  नवीन नोटांच्या टंचाईमुळे ।।१८।।
नोट काही बदलून मिळेना  पाचशेचे शंभर सुट्टे मिळेना 
चलन तिढा सुटता सुटेना  बँकेसमोर लांबच लांब रांगा ।।१९।।
नोट मिळत नाही म्हणती  नोटा संपल्या उद्या या म्हणती 
उद्याचीही नाही शाश्वती  नवीन नोटांचा झाला खडखडाट ।।२०।।
काळ्या पैशाविरुद्ध आहे लढाई  अतिरेक्यांविरुद्ध लढाई 
म्हणून नोटांची टंचाई  सामान्य म्हणती थोडी कळ सोसुया ।।२१।।
पाचशेच्या नोटेत चणे बांधतो  हजारांची नोट भिकारी नाकारतो
जुन्या नोटांचा जोक चालतो सोशल मीडियावर धमाल ।।२२।।
कोणी स्वीस बँकेत पैसे ठेवती  मल्ल्यासारखे पळून जाती 
सामान्य माणसांस त्रास किती  कोणाची शिक्षा कोणाला ?।।२३।।
मोठे व्यापारी कर्ज बुडविती  सामान्य माणसांस वेठीस धरती 
मल्ल्या पळताना पहात बसती  अजब असे कसे सरकार ?।।२४।।
जनतेची संपत्ती कर्ज म्हणून देती  मोठे व्यापारी कर्ज बुडविती  
त्यांची कर्जे माफ कशी होती  जनतेने सरकारला जाब विचारावा ।।२५।।
कर्ज बुडवे कोण सर्व माहित आहे  कर बुडवे कोण तेही माहित आहे 
सरकार खोटी सारवासारव करत आहे  म्हणे मल्ल्याला पकडणार ।।२६।।
करबुडवे लबाड व्यापारी पठ्ठे  काळ्या नोटांचे जमविती गठ्ठे 
देशाला लागती आर्थिक धक्के  अर्थव्यवस्था डळमळते ।।२७।।
आता चांगले काही तरी होणार  अर्थ व्यवस्था मजबूत होणार  
लोक म्हणती त्रास हा सोसणार  मोदींना सहकार्य करूया ।।२८।।
रोखीचे व्यवहार शक्यतो टाळा  आता चहा पेटीएमने मिळू लागला   
कॅशलेस व्यवहार करूया सगळा  म्हणती देशाचे अर्थमंत्री ।।२९।।
कोणी ऑनलाईन व्यवहार करती  तिथेही सायबर हल्ल्याची भिती   
खात्यातले पैसे अचानक गायब होती  इथे शिकलेले सायबर चोर ।।३०।।
व्यापारी रोखीने व्यवहार करती  कर चुकविण्याची मिळते संधी 
व्यवहाराची नोंद  ठेवती  सरकारचा कर सारा बुडतो ।।३१।।
कॅशलेस व्यवहार करता  व्यवहाराची नोंद वहीत होता 
कराची वसुली लगेच होता  सरकारची तिजोरी लगेच भरते ।।३२।।
रोखीने जे व्यवहार होती  व्यवहाराच्या नोंदी  ठेवती 
कर भरण्यापासून सुटका करती  पळवाट हि व्यापाऱ्यांची ।।३३।।
कोणी म्हणे मल्ल्याला पकडा  म्हणती स्वीस बँकेतील पैसा काढा 
मोठ्या कर बुडव्यांना पकडा  सामान्यांना का म्हणून त्रास ?।।३४।।
मल्ल्या लंडनला पळून जातो  सामान्य मात्र रांगेत उभा राहतो 
उन्हाचा त्रास सहन करतो  आपलाच पैसा बदलण्यासाठी ।।३५।।
असे कर्ज बुडवे पळून जाती  कर बुडवे पैसा भिंतीत लपविती 
सरकारची ह्यावर उत्तरे नुसती  सामान्य लोकांना उगाच त्रास ।।३६।।
काळा पैसा इमारतीत गुंतला  काळा पैसा सोन्यात गुंतला 
काळा पैसा भिंतीत दडला  सरकारने शोधून काढावा ।।३७।।
रांगेत उभे राहून लोकं थकली  नोटा मोजणारी यंत्रे बिघडली 
दूध व्यापाऱ्यांनाही चणचण भासली  नवीन नोटा चलनाची ।।३८।।
सगळाच व्यवहार कार्डाने करावा  रोखीने व्यवहार नाकारावा 
किरकोळ खर्चही प्लास्टीक पैशाने व्हावा  रोकड हवीच कशाला?।।३९।।
शेवटी हवी आहे शुद्ध नीतिमत्ता  तरच दिसेल लोकशाहीची सत्ता
तयानेच पोहोचेल आर्थिक सुबत्ता  समाजाच्या तळागाळापर्यंत ।।४०।।
कवी / लेखक - सुरेश पित्रे, चेंदणीठाणे 
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा