रविवार, २९ मे, २०११

|| वारी आषाढीची ||




होता राम प्रहर | करू विठ्ठलाचा गजर |
सातशे वर्षे निरंतर | परंपरा वारीची ||१||
धोतरटोपी वेश पांढरा | घालूनी स्वच्छ सदरा |
पंढरीची वाट धरा | म्हणे वारकरी ||२||
खाऊ चून भाकरी | चला गाठू पंढरी |
मुखे बोलू श्रीहरी | म्हणे वारकरी ||३||

तुळस घेऊ डोईवरी | आम्ही विठूचे माळकरी |
विठ्ठल विठ्ठल हरी | म्हणे वारकरी ||४||
सगुण भक्तीचा संग | वारकरी होतो दंग |
गातो रसाळ अभंग | राम कृष्ण हरी ||५||
हरीनाम गर्जते वाणी | चालू आम्ही अनवाणी |
पाहू चला चक्रपाणि | पांडुरंग हरि ||६||

वेध आता आषाढीचे | नाम मुखी विठ्ठलाचे |
विठ्ठल नामे नाचे | विठूचा वारकरी ||७||
टाळ मृदुंग वाजे | तुळशीमाळ गळा साजे |
विठ्ठल नाम गर्जे | चाले वारकरी ||८||
ऊंच पताका फडकती | वारकरी फेर धरती |
घागरी  डोईवरती  | चाले वारकरी ||९||

चंदन टिळा कपाळी | टाळ वीणा वाजे चिपळी |
पालखी हि आगळी | चाले वारकरी ||१०||
भक्त जमले प्रांगणी | अश्व धावतो रिंगणी |
पहा सोहळा पटांगणी | म्हणे वारकरी ||११||
वारक-यांचा हा मेळा | उभा विठोबा सावळा |
पाहू भरुनिया डोळा | म्हणे वारकरी ||१२||

अबीर गुलाल उधळा | उधाण भजनी मंडळा |
आनंद भरला सगळा | विठ्ठलाच्या दारी ||१३||
उत्सव हा वेगळा | एकमेका भेटू गळा |
पाहू विठू वेळोवेळा | चंद्रभागेतिरी ||१४||


प्रेषक  - सुरेश रघुनाथ पित्रे. चेंदणी, ठाणे
संपर्क - ०२२ - २५३२६४२९ ,
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९ ,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा