शुक्रवार, १७ जानेवारी, २०२०

// मराठी नर्मदा नवरत्न स्तुती //

 // मराठी नर्मदा नवरत्न स्तुती // - - अभी इस पोस्ट को शेअर ना करे - कवी मित्र श्री अरविंद ओक ह्यांना मी दोनतीन वेळा श्री नर्मदा देवीचे काही काव्य लिहावे अशी विनंती करत होतो , आजही त्यांच्या एका पोस्टला कमेंट तशीच लिहिली आणि काय झाले माहित नाही पण आताच मलाच आठ श्लोक चालीत लिहायची प्रेरणा झाली , मला वृत्त छंद मात्रा ह्याचे ज्ञान नाहीये त्यामुळे कवी मित्रानी तपासून दुरुस्ती सुचवावी अशी विनंती , काव्यामध्ये कुठे दुरुस्ती असेल तर दुरुस्त करून पुन्हा अपलोड करण्याची इच्छा आहे , म्हणून ह्याची इमेज बनविली नाहीये , तो पर्यंत कोणी शेअर करू नये हि विनंती , अभी इस पोस्ट को शेअर ना करे - नर्मदे हर !
// मराठी नर्मदा नवरत्न स्तुती //
माया मोह नित्य सतत छळते /
रेवा दर्शनाने मन शांत होते /
रेवा स्मरणाने आनंद मनांस /
रेवा भजनाने मोद शरीरांस //१//
हे नर्मदे ध्यान तूझेच करतो /
भजन तुझेच रेवे नित्य गातो /
गे नर्मदे नाम तूझेच स्मरतो /
पुन्हा गं पुन्हा गं चरणी नमितो //२//
रेवेचेच नाम उठतां बसतां /
रेवा नाम मुखी कोणाला बघतां /
पक्षी प्राणी किंवा झाड दिसतां /
तुझेच नाम गं मुखी नित्य माता //३//
चरणी तुझ्याच हा जीव रमतो /
कुशीत आईच्या आनंदे रहातो /
रेवे नर्मदे गं तुझे गीत गातो /
रेवे नर्मदे गं चरणी नमितो //४//
संकल्प पूजा रेवेचीच करतो /
रेवा चरणीच नमितो नमितो /
रेवा जल गोड प्राशन करतो /
रेवा नाम गोड मुखाने जपतो //५//
रेवेचाच जप सतत मनांत /
रेवेचेच ध्यान सतत जळांत /
आई नर्मदेचे दर्शन करतो /
काव्य सुमनें अर्पण करतो //६//
रेवा दर्शनाने लाभुदे हो भक्ती /
रेवा सत्संग देतो पहा शक्ती /
रेवा भजनाने लाभतें हो भुक्ती /
अनेक जन्मांच्या पापातून मुक्ती //७//
वृत्त मात्रांचे मला ज्ञान नाही /
रेवेचीच स्फूर्ती प्रयत्न हा पाही /
झाले हो स्तवन नर्मदा प्रेरणे /
मनाला आनंद रेवा स्तवनाने //८//
रमे ना रे मन आता व्यवहारी /
रेवाचं सतत हृदय मंदिरी /
मन हे सतत रेवेच्या किनारी /
पुन्हा जाऊ म्हणें रेवेच्या किनारी //९//
लेखन - सुरेश पित्रे , चेंदणी , ठाणे.
१७ जानेवारी - २०२० - शुक्रवार.

शुक्रवार, ३१ मे, २०१९

पुण्यश्लोक श्री अहिल्यादेवी ह्यांचे संपूर्ण दीर्घ काव्य (संक्षिप्त चरित्र अभंगामधे )

नर्मदा उत्तर तटावर  - महेश्वर - श्री अहिल्यादेवींची राजधानी
पुण्यश्लोक श्री अहिल्यादेवी ह्यांचे संपूर्ण दीर्घ काव्य (संक्षिप्त चरित्र अभंगामधे )
श्री अहिल्याबाई ।। श्री अहिल्यादेवी ।।
दीर्घ काव्य मराठी रचना - ६/६/६/६ – 
लेखन - सुरेश पित्रे (रघुनाथसुत)चेंदणीठाणे.  
लेखन काळ - ३० ते ३१ मे २०१९ 
नमो गजानना । नमितो शारदा ।
नमितो नर्मदा । माय माझी रेवा ।।१।।
नर्मदा किनारी । उत्तर तट हा ।
तिथे मोठा किल्ला । महेश्वर नांव ।।२।।
परिक्रमा पायी । करून घेतली ।
नर्मदेने माझी । तेव्हाच मनात ।।३।।
असे होते पहा । अभंग काव्यांत ।
अहिल्यादेवींची । कथा ती लिहावी ।।४।।
योग आला पहा । जयंतीदिनी हा ।
आदल्या दिवशी । सुरुवात केली ।।५।।
@@@@@@@@@@@@@@@
अहिल्याबाई ह्या । एक दानशूर ।
कर्तृत्ववान नि । धर्म परायण ।।
पुण्यश्लोक देवी । त्यांना ते म्हणती ।
घराणे त्यांचे ते । होळकर होतें ।।
शके सतराशे । वर्ष पंचवीस ।
एकतीस होती । जन्माची तारीख ।।
महाराष्ट्र क्षेत्री । अहमदनगरी ।
क्षेत्र जामखेडी । चौंडी ह्या गावांत ।।
अहिल्या बाईंचे । वडील तें होतें 
माणकोजी शिंदे । गावचे पाटील ।।
वडिलांचे नांव । माणकोजी शिंदे ।
आईचे नांव तें । सुशिलाबाई हो ।।
अहिल्या बाईंचे । आजोळ  तें होतें 
उस्मानाबादचे । चोराखळी गांव ।।
चौंडी गावामधे । मामा त्यांचे  होतें 
आडनाव होतें । मैंदाड असें हो ।।
पूर्वीच्या काळांत । स्त्रियांना पहा ती ।
शिक्षण देण्याची । पद्धत नव्हती ।।
तरी वडिलांनी । त्याच हो काळांत ।
लिहिणें वाचणें । शिकविले ह्यांना ।।
पेशवे राज्यांत । एक सरदार ।
मल्हारराव  तें । होळकर  होतें ।।
माळवा प्रांताचे । जहागीरदार ।
पुण्यास जाताना । चौंडीस थांबले ।।
ऐकल्याप्रमाणे । सांगितले पहा ।
मल्हार रावांनी । चौंडी गावामधे ।।
आठ वर्षाच्या त्या ।  अहिल्याबाईंना 
एका देवळांत । पाहिले तें पहा ।।
त्यांनी त्या मुलीला । वधु म्हणून  तें  
पुत्रासाठी पहा । निवडले  होतें ।।
मल्हार रावांचा । पुत्र खंडेराव ।
त्यांच्याशी लागले । लग्न अहिल्येचे ।।
अहिल्या बाईंना । पुत्र मालेराव ।
कन्या मुक्ताबाई । दोन ही अपत्यें ।।
कुंभेर युद्धांत । पती खंडेराव ।
ह्यांना लढाईत । वीरगती झाली ।।
खंडेराव ह्यांच्या । निधना नंतर 
सती म्हणून त्या । चालल्या अहिल्या ।।
पण तें रोखले । मल्हार रावांनी ।
कारभार पहा । आपण म्हणाले ।।
प्रजाहितासाठी । सती न जावें ।
असे म्हणुनी तें । अडविले त्यांना ।।
नंतर सुमारे । बारा वर्षांनी तें 
मल्हाररावांना । मृत्त्यूने गाठलें ।।
त्यांच्या नंतर ती । माळवा प्रांताची 
धुरा सांभाळली । अहिल्या बाईंनी ।।
मल्हार रावांचा । आणखी तो होता । 
तुकोजीराव हा । दत्तक सुपुत्र ।।
अहिल्या देवींच्या । सैन्याचा तो मुख्य ।
सेनापती होता । तुकोजीराव हा ।।
सैन्याचे नेतृत्व । स्वतःच पाहुनी ।
अहिल्या बाईंनी । राज्य सांभाळले ।।
राज्य कालावधी । इसवी सनाचे  
सतराशे आणि । वर्ष सदुसष्ट ।।
सन तें सत्राशें । पंच्याणव साल ।
तो पर्यंत केला । कारभार पहा ।।
अहिल्या देवी ह्या । तत्वज्ञानी राणी ।
म्हणून प्रख्यात । होत्या पहा तेव्हा ।।
अहिल्या राणींनी । राजधानी पहा ।
हलविली तेव्हा । नर्मदा किनारी ।।
नर्मदा नदीच्या । उत्तर तीरी ते । 
महेश्वर स्थान । राजधानीसाठी ।।
प्राचीन नाव ते । माहिष्मती असें ।
प्रसिद्ध ते होते । प्राचीन काळांत ।।
प्रशासकीय नि । सैन्याच्या कामांत ।
पारंगत होत्या । श्री अहिल्या देवी ।।
अंदाजे ती वर्षं । एकोणतीस ती ।
माळवा इथे ते । राज्य केले त्यांनी ।।
उचित अशा त्या । न्यायदानासाठी ।
प्रसिद्धच होत्या । श्री अहिल्या देवी ।।
भारत भरात । नवीन बांधिली ।
मंदिरे नि घाट । नद्यांच्या किनारी ।।
अनेक ठिकाणी । जीर्णोद्धार केला ।
हिंदु मंदिरांचा । आणि घाटांचाही ।। 
महेश्वर आणि । इंदूर गावांना ।
सुंदर प्रशस्त । रस्ते बनविलें ।।
विविध मंदिरे । धर्म शाळांच्याही 
पहा त्या बनल्या । आश्रयदात्या हो ।।
विविध ठिकाणी । नाना तीर्थक्षेत्रीं । 
धर्मशाळा खूप । त्यांनी त्या बांधल्या ।।
त्यामधे प्रमुख । द्वारका नि काशी ।
उज्जैन नाशिक । अशी तीर्थक्षेत्रें ।।
मुस्लीम गजनी । महंमदाने तें ।
उध्वस्त जे केले । सोमनाथ तीर्थ ।।
तुटलेले स्थान । मंदिर पाहून ।
अहिल्यादेवींनी । स्थान ते पाहुनी ।।
दुसरे शिवाचे । वेरावळ स्थानीं 
मंदिर नवीन । बाजुला बांधले ।।
सोमनाथ इथे । जाणारे लोक तें ।
इथेही घेतात । दर्शन शिवांचे ।।
कल्याणकारी जे । प्रजेच्या हिताचे ।
सर्व काही केलें । अहिल्यादेवींनी ।।
सासरे मुलाच्या । मृत्त्यूच्या नंतर ।
पेशव्यांकडे ती । केली हो विनंती ।।
आह्माला स्वतःच । राज्य कारभार ।
करू द्यावा हो । माळवा प्रांताचा ।।
पूर्वीच शासक । म्हणून हुशार ।
आणि अनुभवी । म्हणून असे झालें ।।
माळवा इथे तें । राज्य करण्यांस ।
काही विरोधक । अहिल्याबाईंचे ।।  
विरोधक होतें । खूप ते तरीही ।
होळकर सैन्य । उत्सुक तें पहा ।।
त्यांच्या हाताखालीं । साथ देत होतें ।
अहिल्या देवींना । राज्य  करण्यांस ।।
विरोधकांनाच । सैन्यात घेऊन 
चाकरी देऊन । असें नमविले ।।
तुकोजी रावास । दत्तक पुत्रांस । 
केले सेनापती । मुख्य तो नेमिला ।।
त्यानंतर पहा । पूर्ण दिमाखात ।
माळव्यांस त्यांनी । केले हो प्रयाण ।।
पडदा प्रथा ती । पाळली नाही हो 
मोडीत काढली । पडद्याची प्रथा ।।
जनतेसाठी तो । रोज भरविला ।
दरबार खांस । निवाड्यासाठी तो ।।
लोकांची गाऱ्हाणी । ऐकून तो त्यांना ।
न्याय देण्यास त्या । राहिल्या तत्पर ।।
जरी राजधानी । माळवा प्रांताची । 
नर्मदा किनारी । होती तरी पहा ।।
इंदूर खेड्याचा । माळवा प्रांताचा ।
विकास केला तो । त्यांनी तेथूनच ।।
इंदूर बनले । मोठे ते शहर ।
रस्ते आणि किल्ले । बांधले त्यांनीच ।।
माळव्यात त्यांनी । रस्ते आणि किल्ले ।
अनेक बांधुनी । उत्सव भरविलें ।।
नित्य मंदिरात । व्हावी ती पूजा ।
म्हणून दिले तें । भूमी दान धन ।।
माळव्या बाहेर । तिथेही बांधली ।
मंदिरें नि घाट । विहिरी तलाव ।।
धर्मशाळा त्याही । अनेक बांधल्या ।
अनेक ठिकाणी । आजही दिसती ।।
अहिल्या बाईंनी । बांधलेली यादी ।
आहे खूप मोठी । अशी पहा बरं ।।
काशी आणि गया । शिव सोमनाथ ।
अयोध्या मथुरा । हरिद्वार कांची ।
अवंती द्वारका । बद्रीकेदार व  
जगन्नाथपुरी  रामेश्वर आदी  
अहिल्या देवीस । होतसे आनंद ।
शेतकरी होतां । सुदृढ सधन ।।
नाही जाणविला । अधिकार पहा ।
कधीच तो त्यांचा । शेतकऱ्यावरी ।।
नियमाप्रमाणे ।  बाकी कारभार ।
धनाढ्यांकडून । चालविला पहा ।।
रयतेसाठीच । काळजीपोटी ही । 
अनेक केली ती । कामे पहा त्यांनी ।।
विधवा स्त्रियांना । केली ती मदत ।
पतीची संपत्ती । पत्नीला मिळेल ।।
अशी तजवीज । त्यांनी केली पहा । 
विधवा स्त्रियांच्या । आधार त्या मोठ्या ।।
त्यांच्या त्या राज्यांत । विधवेला पहा ।
घेतां येत होते । मुलाला दत्तक ।।
दत्तक विधान । करण्यास पहा ।
लाच मागितली । एकदा मंत्र्याने ।।
नकार मंत्र्याने । दिला तो म्हणून ।
कळलें देवींना । म्हणून तें केलें ।।
तेव्हा त्यांनी पहा । स्वतः आयोजिला ।
दत्तक विधान । कार्यक्रम तेथें ।।
दिले धन दान । दागिने कपडे ।
असें सुखविले । अहेर देउनी ।। 
राज्य सीमेवर । भिल्ल आणि गोंड ।
रहात होते ते । काय तिथे झाले ।।
भिल्ल आणि गोंड । जातींचा विवाद ।
सोडविता नाही । आला तो देवींना ।।
म्हणून त्यांनाच । पहाडी जमीन ।
दिली त्यांनी पहा । देणगी म्हणून ।।
आणि वाटेवरी । दिला अधिकार ।
कर तो घेण्यास । त्यांना तो पहा ।।
पण त्या भिल्लांच्या । हालचालीवर ।
लक्षं त्यांचे होतें । बारीक ते पहा ।।
पण त्यांचे लक्ष । होते भिल्लांवर 
इंग्रजी लेखक । माल्कम म्हणतो ।।
अहिल्या देवींची । महेश्वर जणू ।
राजधानी होती । कला क्षेत्राचीही ।।
काव्य नि संगीत । कला व उद्योग ।
ह्याची जणू संस्था । महेश्वर होतें ।।  
प्रसिद्ध मराठी । कवी  मोरोपंत ।
आणि ते शाहीर । अनंतफंदी हो ।
अशा ह्या कवींना । कला माहीरांना । 
संस्कृत विद्वान । खुशालीरामाना ।।
अहिल्याबाईंनी । राजाश्रय तोही 
दिला होता पहा । महेश्वर इथें ।।
कलाकार आणि । मूर्तिकार ह्यांना ।
देवींच्या राज्यांत । वेतन सन्मान ।।
महेश्वर इथे । हातमाग पहा ।
गिरणी वस्त्रांची । चालू केली तेव्हा ।।
आजही जाउनी । पहाव्या गिरणी ।
महेश्वरी वस्त्रं । तिथे बनती हो ।।
एकोणीस आणि । विसाव्या शतकी ।
अभ्यासकारांनी । सर्वानी पाहिलें ।।
भारतीय आणि । इंग्रजी तसेंच ।
अमेरिकनही । इतिहासकार ।।
ह्यांनी ते मानलें । अहिल्या देवी ह्या ।
होत्या संतपदी । जनतेच्या वाली ।।
अहिल्याबाई त्या । एक अतिशय ।
योग्य त्या शासक । संघटक होत्या ।।
मध्य भारताच्या । इंदूर मधील ।
त्यांचा राज्यकाळ । तीस वर्षे पहा ।।
हा एक होतां । स्वप्नवत काळ ।
कायद्याचे राज्य । पहाया मिळालें ।। 
त्यामुळेच त्याहो  सुराज्य काळात ।
जनतेची झाली । भरभराट खूप ।।
अहिल्यादेवीना । जीवनकालात ।
सन्मान मिळाला । तसेंच नंतर ।।
मृत्यूनंतरही । लोकांनी तो त्यांना ।
दिला होता पहा । संताचा तो दर्जा ।।
पुरुषांमधले । जसें महाराज 
शिव छत्रपती । शिवाजी तें झाले ।।
तशाच उत्तम । अहिल्याबाई ह्या । 
स्त्रियांमधील त्या । राज्यकर्ती पहा ।।
जिच्या त्या चांगल्या । बुद्धी नि गुणांचे । 
चांगुलपणाचे । उदाहरण तें ।।
देता येतें पहा । अहिल्याबाईंचे । 
असा आदर्श तो । ठेविला समोर ।।
त्यांच्या असामान्य । कर्तृत्वाने पहा ।
अहिल्याबाईंनी । मन तें जिंकले ।।
माळव्यातील त्या । उच्च धुरीणांनी । 
लोकांनी मानलें । अवतार त्यांना ।।
सर्वांत शुद्ध व । आदर्श अशी हि । 
शासक होत्या त्या । श्री अहिल्या देवी ।।
आताच्या काळांत । चरित्रकार तें ।
असें मानतात । अहिल्याबाईंना ।।
तत्त्वज्ञानी राणी । असे म्हणतात ।
जसा तत्वज्ञानी । राजा भोज होता ।।
इंदूरमधील । देवी शासकांनी ।
त्यांच्या त्या राज्यांत । सर्वांस चांगले ।।
काम करण्यास । प्रोत्साहन दिले ।
व्यापार वाढला । चालना मिळाली ।।
शेतकरी होतें । शांततेत आणि ।
दबावरहित । होती पहा लोकं ।।
अन्याय कोणता । कळतां राणींस । 
कडकपणे त्या । हाताळत होत्या ।।
अहिल्याबाईंना । आपल्या प्रजेचा ।
उत्कर्ष पहाया । आवडत असें ।।
आपली संपत्ती । उघड करून ।
देवींस दाविती । न घाबरता तें ।।
हिसकावून ती । संपत्ती घेतील 
अशी स्थिती पहा । नव्हती राज्यांत ।।
दूर दूर असें  रस्त्यांच्या कडेला ।
दाट छायादार । वृक्ष वाढविलें ।।
विहिरी बांधल्या । पथिकांसाठी त्या ।
विश्रांतीगृहेही । गरिबांसाठीही ।।
घर नसलेल्या । अनाथ सर्वांना ।
जरुरीनुसार । मिळायचे सर्व ।।
पहाडामधून । चालू असायची ।
व्यापाऱ्यांची येजा । पूर्वीपासून ती ।।
त्यांच्या सामानाची । लूट ती भिल्लांची । 
अहिल्याबाईंनी । बंद करविली ।।
प्रामाणिकपणे । शेती करण्याची ।
संधी त्यांना दिली । जमिनी देऊन ।।
सर्व समाजाला । अहिल्याबाई त्या ।
आवडत होत्या । म्हणून पहा हो ।।
त्यांना ते उदंड । आयुष्य लाभावे ।
म्हणून प्रार्थना । जनतेची होती ।।
बाईंच्या कन्येचा । पती होता पहा ।
श्री यशवंतराव । फानसे ते नांव ।।
पतीच्या मृत्त्यूच्या । नंतर गेली ती ।
कन्या ती सती । गेली पहा अशी ।।
सती जाणे तीचे । अहिल्याबाईंच्या ।
जीवनातले तें । मोठे दुःख होते ।।
कन्येच्या जाण्याचे । शेवटचे दुःख ।
अहिल्याबाईंना । खूप झालें पहा ।।
सत्तर वर्षांचे । आयुष्य लाभून  
प्राणज्योत पहा । निमाली देवींची ।। 
@@@@@@@@@@@@@@
अभंग रचना - ६/६/६/६
लेखन - सुरेश पित्रे (रघुनाथसुत)चेंदणीठाणे.   
भारत स्वतंत्र । झाल्या नंतरही ।
पुढील अनेक । वर्षे शेजारील ।।
जबलपूर नि । भोपाळ ग्वाल्हेर ।  
या शहरांपेक्षाही । इंदूर पहा तें ।। 
सर्व बाबतीत । होतें पुढें पहा । 
अहिल्याबाईंची । दूरदृष्टी हीच ।। 
सन एकोणीश्शे । शह्यांणवं मधे ।
इंदूर मधील । नागरिकांनी तो ।      
स्मृतीस देवींच्या  अभिवादन तें ।
म्हणून ठेविला । पुरस्कार खांस ।।
जनतेची सेवा । विशेष करितो ।
त्यांस दिला जातो । पुरस्कार पहा ।।
पहिल्या वर्षी तो । पुरस्कार दिला ।
नाना देशमुख । ह्यांना तो पहा ।। 
त्यांच्या स्मरणार्थ । इंदूर विद्यापीठ ।
अहिल्याबाईचे । नांवे झळकले ।।
अहिल्याबाईंच्या । सन्मान प्रीत्यर्थ ।
महिना ऑगस्ट । पंचवीस दिनी ।।
भारत देशाने । डाक तिकिट तें ।
जारी केले पहा । देवींच्या नांवाने ।।
महान अशा त्या । शासनकर्तीस ।
मानाची वंदना । म्हणून पहा ते ।।
इंदूर शहरीं । विमानतळ तो   
अहिल्याबाईंचे । नांवे झळकला ।।
महेश्वर इथे । त्यांची राजधानी ।
पण त्यांनी केली । देशभर कामें ।।
आता त्याची यादी । देतां इथें पहा 
काव्याचा विस्तार । खूप तो होईल ।।
म्हणून टाळतो । लिहिणे पहा तें ।
सर्वच ठिकाणी । त्यांनी काम केलें ।।
सर्वं तीर्थक्षेत्रीं । बांधलें ते घाट ।
धर्मशाळा खूप । सर्वं भारतात ।।
हल्लीच्या काळांत । अहिल्याबाई ह्या ।
नांवें चित्रपट । प्रकाशित झाला ।।
अनेक लेखक । ह्यांनी ती लिहिली ।
अहिल्याबाईंची । पुस्तके अनेक ।।
इंदूर शहरीं । शिक्षण संस्थेने ।
माहितीपट तों । बनविला आहे ।।
अनेक भाषेंत  पहा लेखकांनी ।
लिहिली पुस्तकें । अहिल्या देवींची ।।
प्रत्येक खंडात । सहा सहा अशी ।
अक्षरें योजून । अभंग प्रकार ।।
अहिल्या देवींची । जयंती आज ती ।
सुयोग जुळला । आज शुक्रवारी ।।
शुक्रवार जाणा । देवीचा तो वार ।
प्रेरणा तिचीच । कथा हि लिहिली ।।
शके एकोणीश्शे । एक्केचाळीसला ।
वैशाख महिना । कृष्ण द्वादशीस ।।
झालें पहा पूर्ण । काव्य अभंगात ।
इच्छा ती देवीची । सुरेश माध्यम ।। १६२।।
अभंग रचना - ६/६/६/६
लेखन - सुरेश पित्रे (रघुनाथसुत)चेंदणीठाणे. 
लेखन काळ - इंग्रजी तारीख - ३१/०५/२०१९  
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
इसमें अभी हर एक पंक्ति को क्रमांक नहीं दिए है ,
क्योंकि इसमें और कम ज्यादा लेखन हो सकता है |  


x