गुरुवार, २१ जून, २०१८

|| अभंग प्लास्टीकचा ||

|| अभंग प्लास्टीकचा || 
अभंग - ६|||४ - चाल - आरंभी वंदीन | अयोध्येचा राजा 
इकडे प्लास्टीक | तिकडे प्लास्टीक | जळी स्थळी झाले | प्लास्टीक ते ||१||
पहावे तिकडे | दिसते प्लास्टीक | प्लास्टीक ते झाले | उदंड ते ||२|| 
दुकानात मिळे | पिण्याचे ते पाणी | बंद बाटली ती | प्लास्टीकची ||३|| 
प्लास्टीकची सीडी | गाणे ऐकण्याची | प्लास्टीक ते झाले | सर्वत्र हो ||४|| 
केस बांधण्याचा | पट्टा प्लास्टीकचा | गळ्यात हार तो | प्लास्टीकचा ||५|| 
टेबल नि खुर्ची | कपाटही झाले | प्लास्टीकच्या झाल्या | सर्व वस्तु ||६||   
चपला जोड तो | प्लास्टीकचा आहे | रेनकोट तोही | प्लास्टीकचा ||७|| 
अनेक वस्तु त्या | प्लास्टीकच्या झाल्या | घर ते भरले | प्लास्टीकने ||८|| 
प्लास्टीकचा मोठा | राक्षस तो झाला | मातला मातला | जगांत ह्या ||९||  
जगांत सर्वत्र
 | साठले प्लास्टीक | निसर्गाचा तोल | बिघडला ||१०||  
प्लास्टीक साचून | तुंबली गटारे | बंद झाली दारे | गटारांची ||११|| 
प्लास्टीकचा गाळ | साचला नाल्यांत | बंद तेही झाले | मोठे नाले ||१२|| 
पातळ प्लास्टीक 
| नका वापरू हो | जाड ते प्लास्टीक | वापरा हो ||१३|| 
फेकू नका तुम्ही | प्लास्टीक नाल्यात | गटारांत तेही | टाकु नका ||१४|| 
नद्या नाले सारे | तुंबती तुडुंब | माशां डास खूप | वाढले ते ||१५|| 
डेंग्यूने थैमान | घातले शहरीं | घरोघरीं आणि | गावांतही ||१६|| 
वाढला वाढला | भस्मासूर मोठा | प्लास्टीक साचतां | येतो पूर ||१७|| 
प्लास्टीक जाळतां | विषारी खूप तो | पसरतो धूर | सर्वदूर ||१८||
काही प्लास्टीकचे | आहेत फायदे | पण तोटे खूप | आहेत हो ||१९|| 
प्लास्टीकमुळे ते | वाचते हो झाड | वाचते लाकूड प्लास्टीकने ||२०|| 
प्लास्टीक आहे हो | जलरोधक ते | वायुरोधकही | प्लास्टीक हो ||२१|| 
पण घातक ती | पर्यावरणांस | अशी नको वस्तु प्लास्टीकची ||२२|| 
पाण्याच्या बाटल्या | सरबताच्याही | एकदाच त्याहो | वापरा हो ||२३|| 
बाटलीवर आहे | क्रमांक पहा तो | त्रिकोणात पाच | उत्तम तो ||२४|| 
चांगले प्लास्टीक | पारदर्शक ते | पांढरे प्लास्टीक | उत्तम ते ||२५|| 
शेवटचे काळे | उरते प्लास्टीक | अंतिम दर्जाचे | जाणावे हो ||२६|| 
प्लास्टीक पिशवी | सुलभ सुयोग्य | पर्यावरणांस | अयोग्य ती ||२७|| 
उत्तम नि योग्य | सुवर्णमध्य तो | कापडी पिशवी | वापरा हो ||२८|| 
कचरा ओला तो | खतासाठी योग्य | लोखंड कचरा | धातूसाठी ||२९|| 
उरला कचरा | प्लास्टीकचा जर | पुनर्वापर तो | करूया हो ||३०|| 
पर्याय शोधणे | कठीण ते आहे | जमीन प्रदुषीत | प्लास्टीकने ||३१|| 
काहींशे वर्षांनी | जमिनीत जाणा होते विघटन | प्लास्टीकचे ||३२|| 
प्लास्टीक वाढले | जग हे तापले | सृष्टी ती गरम | होत आहे ||३३|| 
पर्यावरणाचा | तोल बिघडला | निसर्ग चक्र ते | बिनसले ||३४||
हाक मारते ती | वसुंधरा माता | जागे व्हा जागे व्हा | सर्व जण ||३५||  
सृष्टी ती जननी | आपण लेकरे | आपण सांभाळू | सृष्टीला ह्या ||३६||  
अवघे जनहो | मिळुन करूया | रक्षण आपल्या | पृथ्वीचे ते ||३७|| 
प्रदूषण खूप | वाढले वाढले | नको एकमेकां | दूषणं ते ||३८|| 
शास्त्रज्ञ लागले | कामाला हो आता | शोधती शोधती | पर्याय तो ||३९|| 
आधीच करूया | उपाय आपण | अन्यथा प्रलय | संहारक ||४०||   
पर्यावरणाचे | रक्षण करूया | पाऊल उचला | आधी आधी ||४१|| 
लेखक | कवी - सुरेश पित्रे ठाणेमहाराष्ट्र 

मंगळवार, १२ जून, २०१८

// अभंग गो वंशाचे // अभंग गाईचे //

// अभंग गो वंशाचे // अभंग गाईचे //
गोमाता सांभाळा / प्रत्येक घरांत / गावांत गोशाळा / हवी हवी //
गाय हे जगाचे / आहे हो दैवत / संस्कार बाळाला / हाच देऊ //
गाय आहे आई / वाचवा ती गाय / गाईचीच सेवा / करा आधी //
गाईचे हे दूध / अमृतासमान / जाणून ते घ्यावे / सर्व ज्ञान //१//
सधन आम्हांस / करते हो गाय / रोजगार देते / समाजाला //
गाईची जी सेवा / करती जे जन / आरोग्य लाभते / त्यांना खास //
गाय ती पाळतां / सौभाग्याचे दार / धनलक्ष्मीसाठी / उघडते //
पंचगव्य जाणा / अमृत असे ते / जीवन देई ते / रोगी जीवां //२//
गोमूत्रापासून / सोने ते मिळते / म्हणती शास्त्रज्ञ / शोधले ते //
दूध दही तूप / गोमूत्र गोमय / पंचगव्य सर्व / औषधी ते // 
ताक ते रेचक / पोट साफ होते / बद्धकोष्ठ जाई / पळून ते //
पंचगव्य गुण / गातो आयुर्वेद / प्राचीन तो ग्रंथ / भारताचा //३// 
गाय दूध देते / सर्व समाजाला / लाभते आरोग्य / प्रत्येकाला //
जसे वाचवितो / पाणी आणि झाडे / गाय ती वाचवा / आधी आधी //
भारत म्हणतो / जग हे कुटुंब / जगातले सर्वं / कुटुंबीय //
गोधन आपुले / जपूया हो आता / सुदृढ करूया / जग सर्वं //४//
गो-पालन आणि / गऊ संवर्धन / करू संरक्षण / गोमातेचे //
गोसेवेचा मेवा / नक्कीच मिळतो / जीवन उज्ज्वल / होते होते //
आई ती मरतां / अनाथ बालकां / दूध मिळते हो / गाईचेच //
इथे जीवन देते बालकाला हे शब्द यायला हवेत पण तसे मला जमत नाहीयेत 
गाईचीच पूजा / तेच हो दैवत / जोडी ती बैलाची / उपयुक्त //५//
शेण गोमूत्र ते / पंचगव्य फक्त / वापरा तुम्ही हो / शेतीसाठी //
नको विषारी ती / रसायने अती / उत्तम शेतीला / शेणखतं //
सकस आहार / शुद्ध तो मिळतो / पोषक बनती / फळे धान्य //
निरोगी समाज / निसर्ग तो स्वच्छ / पर्यावरणाचे / संतुलन //६// 
सुरेश पित्रे , ठाणे - ०९/०६/२०१८
प्रयाग माधव अभंग
आरंभी वंदितो / ॐकार गणेश / मंगल करितो / सुखकर्ता //
प्रयाग माधव / अमृत रुपी हा करुणेचा सागर / महाविष्णु //
आर्त लोकांच्या जो / हाकेला धावतो / शरणागताचा / सखा बंधु //
ऐका त्याची कथा / इथे कसा आला / देव हा तुमचा / कोरगावी //
कोणे एके काळी / गोवा ह्या राज्यात / कोरगाव इथे / पित्रे वंशी // 
जन्मला होता हो / वासिष्ठ गोत्राचा / पित्रे ह्या वंशाचा / एक कोणी / 
एक तो पूर्वज / नागू दिवाकर / पित्रे कुळातील / एक भक्त //
जरी होता नागू / कष्टाने पिडला / तरी तो निघाला / काशी क्षेत्री //
आजारी जरी तो / तरीही निघाला / निश्चय करुनी / यात्रेसाठी //
घरून आपल्या / नागू तो निघाला / काशीच्या यात्रेला / तीर्थक्षेत्री //
प्रयाग नामक / तीर्थ क्षेत्रामधे / रात्री स्वप्नामधे / आला देव /
जगदीश म्हणे / आदेश हा माझा / सकाळी मिळेल / वस्तु जी ती //
घेऊन तू जारे / लगेच बरं का / स्वतःच्या तू गावी / त्वरेने हो //
आदेशाप्रमाणे / घडली घटना / स्वप्न तेहो झाले / तिथे स-त्य /
सकाळी मिळाले / एक ते संपूट / मूर्ती त्यात होती / एक छान //
हाती शंख चक्र / कमळ नि गदा / चतुर्हस्त मूर्ती / महाविष्णु //
भक्त मनोरथ / पूर्ण ती करती / अशी हो पाऊले / देवाची ती //
नागू दिवाकर / पित्रे तो ब्राह्मण / घेऊन तो आला / मूर्ती गावी //
त्याने हो बांधले / सुंदर ते छान / कोरगावी देऊळ / एक छोटे //
मुहूर्त पाहुनी / मूर्ती हो स्थापिली / अन्य मूर्ती सवे / प्रतिष्ठा ती  //
भक्तांच्या मनीच्या / शुभ कामना ज्या / फलद्रूप होती / दर्शनाने //
मूर्ती सापडली / प्रयाग ह्या तीर्थी / म्हणून नांव ते / असे आहे //
प्रयाग माधव / पित्रे कुल देव / कोरगावी आहे / भक्तांसाठी //
झाला सुविख्यात / ह्याच हो नावाने / प्रयाग माधव / नाव छान //
तेव्हापासून ते / पित्रे वंशज हे / सेवेत आसक्त / माधवाच्या //
दुरून येती ते / दर्शनांस त्याच्या / माघ पौर्णिमेस / उत्सव तो //
माधवाच्या कृपे / चिन्तामुक्त होवो / प्रार्थना करती / इथे सर्व //
कुशल राहू दे / त्याच्या पायी येता / सदिच्छा त्या पूर्ण / होती इथे //
वचन देउनी / अलिप्त असे तो / प्रयाग माधव / कुलदेव //
मूळ ती संस्कृत / आरति लिहिली / मूळ ते कवी हो / थत्ते शास्त्री //
जतन केली ती / अनंत केशव / पित्रे बडोद्याचे / 
त्याचा अनुवाद / मराठीत केला / अभंग वृत्तात / सुरेशाने //
(इथपर्यंत आहे ते वर्णन संस्कृत आरती मधे आहे त्याचा साधारण अनुवाद 
, त्यापुढील वर्णन हे मूर्तीचे , मंदिराचे आणि दरवर्षी होत असलेल्या उत्सवाचे आहे)
गाभाऱ्या बाहेर / अन्य मूर्ती त्याही / स्थापन त्या केल्या / पहा तुम्ही //
समोरून पहा  / डाव्या त्या बाजुला / गणेशाची मूर्ती / बसविली //
तशीच दुसरी  / उजव्या बाजूला / शिवपिंडी एक  / स्थापियली // 
गाभाऱ्यात आंत / मुख्य मूर्ती आहे / मधोमध ती हो / माधवाची //
उजव्या बाजूला / देवीची ती मूर्ती / कोणी म्हणे दुर्गा / आहे ती हो //
अशी हि रचना / देवळाची आहे / कोरगावी जातां / पहा तुम्ही //
दगडाचे उत्तम / मंदिर भक्कम / प्रवेशद्वार ते / कमानीचे //
गोलाकृती खांब / दगडी ते भव्य / तयांसी जोडती / कमानी त्या //
मुख्य ती मूर्ती / वर्णन करितो / काळ्या पाषाणात / कोरली ती //
मधे तो माधव / सभोवती छोटे / दशावतार जे / आहेत ते //
दशावतार हे / मूर्तीत दिसती / म्हणून हा विष्णू / जाणा तुम्ही //
छान प्रभावळ / पितळी असे हो / मूर्तीच्या भोवती / सुंदर ती // 
पाच नाग फणे / त्यावरी दिसती / लख्ख चमकते / प्रभावळ //
सुंदर साजिरी / पाषाणाची मूर्ती / माघ पौर्णिमेला / उत्सव रे //
प्रयाग इथे हि / सापडली मूर्ती / प्रयाग माधव / नांव झाले //
पित्रे वंशीय ते / जमती सगळी / उत्सव करती / देवाचा तो //
प्रयाग माधवा / कृपा करी आता / हेच रे मागणे / तुझ्या पायी //
दुर्गा देवी तुला / तशीच प्रार्थना / कुलदेवी तू गं / मानली ती //
पित्रे कुलदेवी / कोण ती संभ्रम / कोरगांवात जी / आहे ती का //
कोण म्हणे दुर्गा / विंध्यवासिनी ती / नक्की ना माहित / कुलदेवी //
माधवेश्वरी ह्या / नावाने एक ती / प्रयाग ठिकाणी / एक देवी //
शंकराचार्य ते / लिहून गेले ते / एक आहे स्तोत्र / त्यात पहा //
माधवाची ती का / माधवेश्वरी हो / नाव आहे दिले / स्तोत्र पहा // 
असो तिचा आता / आठव तो केला / मूळ जगदंबा / नमितो मी // 
पार्वती ती मूळ / शक्तिपीठे खूप / माहित आहे ती / कथा आहे //
रघुनाथ पुत्र / सुरेशाने केले / माधव कथेचे / वर्णन हे  //
दोन हजार नि / अठरा साली हे / लिहिले वर्णन / अभंगात //
अधिक महिना / शुद्ध चतुर्दशी / छोटे हे स्तवन / आज झाले // 
गायन हो ह्याचे / करा हो तुम्ही हो / माघ पौर्णिमेला / प्रतिवर्षी // 

हे कोणी लिहिले , तसेच माझ्या वडिलांचा वाढदिवस त्याच तिथीचा  
वगैरे वर्णन पुढे केले आहे 
पहिल्या तीन त्या / प्रत्येक खंडात / सहा अक्षरे ती / पाहिजेत //
शेवटचा खंड / चार अक्षरांचा / असा तो अभंग / छंद जाणा //
अभंग छंदात / केले हे वर्णन / प्रयाग माधव / कथेचे हे //
योगा योग कसा / पहा बघा आहे / माझेही वडील / त्यांचा जन्म //
हीच तिथी आहे / माघ पौर्णिमा ती / त्यांचाही असे तो / जन्म दिन //
सन एकोणीश्शे / साल त्रेचाळीस / जन्म दिवस तो / वडिलांचा //
रघुनाथ पित्रे / ठाण्याचे निवासी / त्यांचाच मी पुत्र / वर्णितो हे //   

एकदा श्री आद्य शंकराचार्य काशीमधे असताना त्यांनी गंगेत स्नान करताना पाहिले एक 
वृद्ध गृहस्थ ''  डुकृञ् करणे '' हे संस्कृत व्याकरणातील सूत्र घोकंपट्टी करून पाठ करत 
होते , त्या वृद्ध गृहस्थाकडे पाहून आचार्यांनी तळमळीने त्यांना जो उपदेश केला 
तो म्हणजेच '' चर्पटपञ्जरिकास्तोत्रम् '' अशा छान स्तोत्राचे गद्द्य भाषांतरावरून 
मराठी काव्य रूपांतर / अभंग करण्याचा छोटासा प्रयत्न.  
श्री आद्य शंकराचार्यांच्या चर्पटपंजरिका स्तोत्राचे 
मराठी काव्य रूपांतर .  - अभंग - छंद - ६/६/६/४
चर्पटपञ्जरिकास्तोत्रम् / मोहमुद्गरस्तोत्रम् 
दिवस सरोनि / संध्या नि रात्र / वसंत शिशिर / पुन्हा पुन्हा //
खेळ हा काळाचा / जीवन सरते / तरी ना सुटे ती / आशा तुझी //
आशा दावी स्वप्न / मिथ्याच ते असे / त्यात मन गुंते / का रे तुझे //
भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भ्रांतमती //धृ//
ठाके मरण ते / समोरचि तेव्हा / घोकंपट्टी तुझी / काय करी //धृ// 
मृ-त्यु पुढे तो  / उभा रे ठाकतां / डुकृञ् करणे / काय करी // धृ// 
मरण पुढे ते / उभे हो ठाकता / नाही उपयोग / डुकृञ् ते // धृ// //१//
आग ती समोर / सूर्य तो रे पाठी / हनुवटी ती रे / गुडघ्यांत //
भिक्षा ती मागण्या / केवळ ओंजळ / विश्राम तो आहे / झाडाखाली //
उदासवाणी ती / अशी सरे रात / आशा ती तरीही / सुटेना ती //
भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भ्रांतमती //२//
जोवर मिळतो / पैसा नि अडका / तोवर ते नाते / घट्ट असे //
वीण रे नात्याची / उसवत जाई / जेव्हा ती आवक / मंदावते //
क्षीण तो होता रे / देह तो जेव्हा रे / विचारी ना कोणी / घरातले //
भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भ्रांतमती //३//
डोक्यावरी जटा / कोणी त्या बांधती / किंवा कोणी करी / मुंडन ते //
वस्त्रे भगवी ती / संन्यासाची घाली / सोंग ते करिशी / किती किती //
पोटाची खळगी / भरणे म्हणून / पाहसी सारे का / काणाडोळा //
भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भ्रांतमती //४//
मनापासून ती / भगवद्गीता / थोडी जरि तु रे / वाचली का //
गंगेचे जल ते / प्राशन तू केले / पूजिला का हरी / मनोभावे //
यमही मग तो / कचरेल मनी / जर तू जपला / हरि हरि //
भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भ्रांतमती //५//
शरीर म्हातारे / मानही हलते / बोळके तोंडाचे / दाताविना //
थरथरणाऱ्या / हातामधे काठी / पायामधे नाही / जोर तरी //
केस ते पिकले / टक्कल पडले / तरी ओढ किती / जगण्याची //
भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भ्रांतमती //६//
बालपण ते रे / खेळण्यात गेले / तरुणपण ते / वाया गेले //
तरुणाई गेली / म्हातारपणी रे / चिंता वार्धक्याची / छळते रे //
सरते आयुष्य / तरीही ती नाही / आस ती ज्ञानाची / का रे तुला // 
भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भ्रांतमती //७//
पुन्हा ते जन्मणे / पुन्हा ते मरणे / कितीवेळा खेळ / जन्मोजन्मी //
पुन्हा ते झोपणे / आईच्या उदरी / जन्म मृ-त्यु तो रे / कितीवेळा //
अवघड फार / भवसागर हा / पार करि मज / कृष्णा तूच //
भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भ्रांतमती //८//
पुन्हा तीच रात्र  / पुन्हा तो दिवस / पुन्हा तो सप्ताह / पुन्हा पक्ष //
पुन्हा तोच मास / पुन्हा तेच वर्ष / परत अयन / संवत्सर //
असा सरे काळ / तरी ना शमते / आशा ती तरीही / कशी जीवा //
भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भ्रांतमती //९//
वय सरल्यावर / तळे आटले ते / आता नाही काम  / उपयोगी //
पैसे ते संपतां / कसले जीवन / निज परिवार / व्यर्थ आतां //
ज्ञान हे मिळाले / भवसागराचे / आता संसाराचे / भय का रे //
भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भ्रांतमती //१०//
नारी देहावर / भाळून चिंतन / सतत मनांत / चालले ते //
ज्याचा तुला मोह / पडला असे ते / मिथ्या जाण हे रे / शरीर ते //  
रक्त मांस हाडे / विकाराचे घर / विचार मनाला / सत्य काय //
भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भ्रांतमती //११//
कोण मी आणिक / कुठून आलो मी / कोण माता पिता / संसारात //
जणू स्वप्नवत / मोहमय जग / स्वप्न ते संपतां / स-त्य कळे //
नि-त्य नूतन ती / माया मोहमयी / अवस्था बदल / नित्य चाले //
भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भ्रांतमती //१२//
भगवद्गीता / रोज ती म्हणावी / हजार नावे ती / रोज म्हणा //
चित्ती आठवावे / भव्य नि सुंदर / रूप मनोहर / विराट ते //
धन नि संपत्ती / गरिबांस देई / सज्जनांची तू रे / कास धरी //
भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भ्रांतमती //१३//
जोवरी देही या / प्राण नांदतसे / तोवरी सारे ते / अलबेल //
देहांत प्राण तो / जोवरी संचरे / तोवरी घरचे / विचारती //
प्राण तो सोडितां / निर्जीव ती काया / पत्नी व घरचे / घाबरती //
भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भ्रांतमती //१४//
सुख वाटे जीवां / संगती रे स्त्रीची / जरी रोगी झाला / तुझा देह //
टेकती गुडघे / मरणा पुढती / सुटका ह्यातून / होत नाही //
तरी ना सुटते / दुष्कर्म तुझे ते / शरीर पापांत / रत होते //
भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भ्रांतमती //१५// 
चिंध्या त्या जोडून / गोधडी शिवसी / वर्ज हे तुला रे / पाप पुण्य //
मी तू सारे विश्व / खोटे हे म्हणसी / मिथ्या मोहमाया / सृष्टी सारी //
मग शोक का रे / वैराग्याचे ढोंग / खरा तोची मनीं / जाण हरि //  
भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भ्रांतमती //१६//
गंगा सागरी ते / वारी हे करिती / व्रत आचरूनी / दाने देती //
ज्ञानाविण सारे / हेच हो करती / नाही ज्ञान मीच / ब्रह्म स-त्य //
सारे ते करुनी / शतजन्म घेती / नाही नाही मुक्ती / ज्ञानाविणं //  
भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भज रे गोविंदा / भ्रांतमती //
ठाके मरण ते / समोरीच तेव्हा / घोकंपट्टी तुझी / काय करी // 
मृ-त्यु पुढे तो  / उभा रे ठाकतां / डुकृञ् करणे / काय करी //१७//
मूळ ते संस्कृत / चर्पट पंजरि / आदि आचार्यांचे / शंकरांचे // 
भक्त जनांना तो / कळण्या सुलभ / माय मराठीत / रूपांतर //
गद्य अनुवाद / त्यावरून केले / काव्य रूपांतर / सोपे सोपे // 
रघुनाथ पुत्र / सुरेशाने केला / सहज सोपा रे / अभंग हा  //
दोन हजार नि / अठरा साली हा / लिहिला अभंग / सोमवारी //
अधिक महिना / कृष्ण त्रयोदशी / छोटे हे स्तवन / आज झाले //१८// 
कवी / लेखक - सुरेश रघुनाथ पित्रे , चेंदणी , ठाणे - पश्चिम - ४०० ६०१
११/०६/२०१८ - सोमवार - रात्री ११ वाजता लिहून पूर्ण झाले