शनिवार, ४ जून, २०११

बहुविकलांग असलेल्या लोकांसाठी काम करणार-या Sankalp Foundation” तालुका 
गुहागर,जि.रत्नागिरी ह्या संस्थेतर्फे प्रकाशित  "घे भरारी " ह्या प्रातिनिधिक काव्य 
संग्रहात हि कविता एप्रिल २०११ मधे प्रकाशित झाली आहे.

||  टॉवर कथा  ||
घेऊ म्हणता घर  | उभा राही कर्जाचा डोंगर |
पैशाची  घर  घर  |  मागे  लागते   ||१||
ज्यांच्या हाती मनी पॉवर | त्यानी बांधले टॉवर |
कमी पड़े विजेची पॉवर  |  उद्वाहनासाठी  ||२||
कोणी म्हणे बिल्ट अप एरिया | कोणी म्हणे कार्पेट एरिया |
ग्राहक म्हणे काय करुया | संभ्रम पडला ||३||
फ्लॅट घेण्याची सर्वाना घाई | पण वाढली महागाई |
पैशाची भासे टंचाई | फ्लॅट विकट घेता ||४||
चाळ नावाची वाचाळ वस्ती | जिथे चाले गप्पा मस्ती |
खर्च नाही जास्ती | घर मध्यम वर्गियांचे ||५||
चाळीचे  फायदे अनेका | प्रसंग येता बाका |
मदत करती एकमेका | शेजार धर्मं जपती ||६||
फ्लॅट नावाची नवी वसती | घराची दारे बंद ठेवती |
स्वतःस कोंडून घेती | चार खोल्यांमधे ||७||
कोण आला कोण गेला | आजारी पडला वा खपला |
न कळे शेजार-याला | खासीयत फ्लॅटची ||८||
वाडे पडून टॉवर बांधती | मजल्यांची नाही पाबंदी |
कारभार  चालला  बेबंदी | सर्व शहरात ||९||
बिल्डर  झाला  सवाई  |  टॉवर  झाले  ठाईठाई  |
सर्वत्र पाणी,वीज टंचाई | म्हणती शांघाय करूया ||१०||
वीज नसता लिफ्ट चालेना | काय करावे कळेना |
जनरेटरविना लिफ्ट हलेना | डीझेलही महागले ||११||
जमीन फक्त टॉवरसाठी | फ्लॅट आहे श्रीमंतांसाठी |
घर नाही सामान्यांसाठी | मुंबई महानगरात ||१२||
सरकार जरी इथे मराठी | मुंबई सोडतो माणूस मराठी |
मुंबई खुली परप्रांतीयांसाठी | रोज येतो लोंढा  ||१३||
पैशाचा इथे आब आहे | टॉवरला बाथ टब आहे |
वातानुकुलीत पब आहे | वाढली श्रीमंत संस्कृती ||१४||
करावे थोडे विचारमंथन | मजल्यांवर असावे बंधन |
वाया न जावे कष्टाचे धन | धरणीकंप होता ||१५||
मुंबई बनता शांघाय | सामान्य माणसाचे होणार काय ?
मुंबई मराठी माणसाची माय | हे खरे कि खोटे ? ||१६||
चाळ पाडून इमारत बांधली | चकाचक संस्कृती आली |
चारचाकी मोटार आली | माणुसकी पार संपून गेली ||१७||
   
==============================
सुरेश पित्रेचेंदणीठाणे (पश्चिम)
 संपर्क - ०२२ - २५३३३८६९ ,२५३२६४२९ ,
भ्रमणध्वनी – ९००४२३०४०९,
Email ID - kharichavata@gmail.com



















|| पाणी म्हणजे जीवन ||

थेंब थेंब साठवावा | थेंबे थेंबे तलाव भरावा |
तलावातील गाळ उपसावा | जल साठ्यासाठी ||१||

लोकहो पाणी अडवा | लोकहो पाणी साठवा |
लोकहो दुष्काळ हटवा | पाणी जमिनीत जिरवा ||२||

आवारात तलाव बांधावे | तलावात पाणी सोडावे |
पावसाचे पाणी साठवावे | शहरी इमारतीत ||३||

विहिरीत कचरा टाकू नये | पाणी दुषित करू नये |
जलस्रोत सुकू नये | ठेवावे हेच उदिष्ट ||४||

जलसंपदा वाचवा | विहिरीचा वापर करावा |
नित्य उपसा असावा | जलशुधीसाठी ||५||

जर पाण्याचा झरा आटला | तर जीवनप्रवास संपला |
विचार हा जयांस पटला | तोच खरा माणूस ||६||

पाणी जपून वापरावे | तेच लोकांस सांगावे |
पाणी सर्वांस मिळावे | हाच असावा हेतू ||७||

बदा बदा पाणी ओतू नये | अपव्यय पाण्याचा करू नये |
थेंबही वाया दवडू नये | पाणी म्हणजे जीवन ||८||

पाण्याने तहान भागते | पाण्याने अन्न पिकते |
अन्नाने भूक शमते | सर्व सजीवांची ||९||

झाडांसाठी रोप लावता | रोपावर पाणी शिंपडता |
रोपाचा मोठा वृक्ष होता | सावली मिळेल पांथस्था ||१०||

पेराल जेव्हा बीज अनेकदा | वाढेल तेव्हा वृक्ष संपदा |
वाढेल मग जलसंपदा | तसाच मिळेल प्राणवायू ||११||

पाणी साठवावे आपण | करावे जलसंधारण |
करावे वृक्षारोपण | गुंतवणूक भविष्याची ||१२||
==================================
सुरेश पित्रेचेंदणीठाणे (पश्चिम)
 संपर्क - ०२२ - २५३३३८६९ ,२५३२६४२९ ,
भ्रमणध्वनी – ९००४२३०४०९,
Email ID - kharichavata@gmail.com

|| करीअर कथा ||

हि कविता खाली दिलेल्या संकेत स्थळावरही आहे
http://new/sec_yuva/may2011_yuva01.html

बारावीचा निकाल | मग सीईटीचा परीक्षाकाळ |
परीक्षांचा झाला सूकाळ | आता ठाई ठाई ||१||

इंजिनीअरिंग का मेडिकल | जाणावा आपुला कल |
पडताळावे इतर सकल | विषय आणि पर्याय ||२||

शिक्षणाचे मार्ग सगळे | पर्याय अनेक वेगळे
जे आपणा न कळे | तज्ञांना विचारावे ||३||

बारावी नंतर काय | प्रश्न करती वडील माय |
आहे यावर उपाय | फक्त मुलांची आवड ||४||

बाळाचे पाय पाळण्यात दिसती | उक्ती अनुभवी सांगती |
त्याची घ्यावी प्रचिती | मुलांच्या भल्यासाठी ||५||

आवडीचे क्षेत्र निवडावे |   तसेच मार्गदर्शन करावे |
मुलांचे भले पाहावे | प्रथम त्यांच्या आवडीत ||६||

आपली आवड कशात | जाणून त्या विषयांत |
मेहनत करावी त्यांत | मुलांनी प्रगतीसाठी ||७||

प्रसिध्द खेळाडू किती | यशस्वी ते उद्योगपती |
त्यांनी केली प्रगती | आवडीच्या विषयांत ||८||

जी आपली आवडी | त्यात घेतली आघाडी |
ते क्रिकेट खेळगडी | फक्त बारावी पास ||९||

गुण असती उपजत | त्यांनाच घालावे खत |
नाही येणार आफत | भविष्यात चिंतेची ||१०||

आवडीच्या विषयात | थोडीच पुरते मशागत |
विषय होईल अवगत | पटकन लवकर ||११||

गायक सुरात नाहले | नायक अभिनयात मुरले |
नर्तक तालात नाचले | आनंदात सुखेनैव ||१२||

चित्रकार चित्रात रंगले | शिल्पकार शिल्पात घडले |
कलाकार कलेत रमले | जातीचे कलावंत ||१३||

आवडीच्या विषयात करता कष्ट | आळस होतो नष्ट |
आलेख दिसतो स्पष्ट | उज्ज्वल भविष्याचा ||१४||

काही चालती धोपट मार्गे | काही धावती झटपट मार्गे |
नका जाऊ आडमार्गे | पैसा आणि प्रगतीसाठी ||१५||

जपावी नैतिकता | निवडा आवडीची उद्योजकता |
नेटाने कष्ट करता | प्रगती आहे निश्चित ||१६||

कोणी करती चर्मोद्योग | कोणी करती कुटीरोद्योग |
करावा असाच उद्योग | मराठी माणसाने ||१७||

निर्णय नसावा अयोग्य | विचार करावा सुयोग्य |
शिक्षण निवडा स्वयोग्य | आवडीच्या विषयात ||१८||

छंद विषयांत नाही ताप | कामाचा नाहीच संताप |
शक्य होते करणे प्रताप | दडपणाशिवाय ||१९||

काम होईल झटपट | उत्साहात छान पटापट |
वाटणार नाही कटकट | आवडीच्या विषयाने ||२०||

आवड असता नाही डोकेफोड | बोलता येईल फडाफड |
प्रश्नांची उत्तरे सडेतोड | देता येतील सदैव ||२१||

आयुष्य सरेल छान मस्त | मन राहील आनंदे चुस्त |
काम होता बिनधास्त | सूर सापडेल प्रगतीचा ||२२||

काम जमता निश्चित | भविष्य नसेल अनिश्चित |
जीवन प्रवाह विनाखंडित | पार पडेल सुरळीत ||२३||

क्षेत्र आवडीचे निवडावे | पदवीस प्राप्त करावे |
प्राविण्य पुढे मिळवावे | प्रयत्ने सातत्याने ||२४||

करिअरची होता घटट मुळे | जीवन वृक्ष फुले फळे |
जीवन अवघे उजळे | समस्त कुटुंबियांचे ||२५||

करिअर कथा वाचावी | तशीच लोकांस सांगावी |
कथेची प्रचिती घ्यावी | सर्व विद्यार्थ्यांनी ||२६||


सुरेश पित्रेचेंदणीठाणे (पश्चिम)
 संपर्क - ०२२ - २५३३३८६९ ,२५३२६४२९ ,
भ्रमणध्वनी – ९००४२३०४०९,
Email ID - kharichavata@gmail.com

|| "मे " ची सुट्टी ||

हि कविता खाली दिलेल्या संकेत स्थळावरही आहे



|| "मे " ची सुट्टी ||

शेवटचा पेपर सुरु , लागली आता सुट्टी  
मैदानात उतरू, विसरून जाऊ कट्टी ||१||

या सर्वांनी करू , सर्वांशी आता बट्टी ,
भांडण सारे विसरू , मारू आपण मिठी ||२||

परीक्षा आज संपे , सोडून देऊ तंटे ,
खेळूया सारे संगे , खाऊ गोड गोड आंबे ||३||

मामा कैरी पाडी , कैरीच्या खाऊ फोडी ,
संपली बाराखडी, चला खाऊ आंबावडी ||४||

बाल नाट्य पाहू, हिमगौरी सात बुटके,
उन्हात नका जाऊ , पायास लागती चटके ||५||

मिळूनी सारे सगळे, पाहू रानी वनी बगळे ,
उन्हाने घाम निथळे , खाऊ थंड थंड गोळे ||६||

मैना राघू काऊ , छान छान पक्षी पाहू ,
गार शहाळे पिऊ , उन्हाळा पळवून लाऊ ||७||

खाऊया गुलकंद , वाटेल थंड थंड ,
राहू नका मंद , जपावे थोडे छंद ||८||

बालगोष्टी वाचू , आनंदे सारे नाचू ,
गंप्या आणि गणू , बालगाणी म्हणू ||९||

विसरा फळा खडू , बॅट चेंडू काढू ,
काच नका फोडू , मिळेल धम्मक लाडू ||१०||

सारे मिळून खेळू , नका कोणास वगळू ,
मुलानो आता पळू , पकडा पकडी खेळू ||११||

टीव्ही कमी पाहू , खेळायला आपण जाऊ ,
कार्टून मुखवटे बनवू, आनंदे बागडू गाऊ ||१२||

झाडेच झाडे लावू , फुलांची बाग फुलवू ,
पायी चालत जाऊ, प्रदूषण ते थांबवू ||१३||

ठकू आणि सखू , फणस गरे चाखू ,
चेंडू घेउनी फेकू , लाल मातीत माखू ||१४||

संपेल "मे " ची सुट्टी, घेऊ पेन्सिल पाटी,
घेऊन फुटपट्टी , लागेल आई पाठी ||१५||


सुरेश पित्रेचेंदणीठाणे (पश्चिम)
 संपर्क - ०२२ - २५३३३८६९ ,२५३२६४२९ ,
भ्रमणध्वनी – ९००४२३०४०९,
Email ID - kharichavata@gmail.com

रविवार, २९ मे, २०११

|| वारी आषाढीची ||




होता राम प्रहर | करू विठ्ठलाचा गजर |
सातशे वर्षे निरंतर | परंपरा वारीची ||१||
धोतरटोपी वेश पांढरा | घालूनी स्वच्छ सदरा |
पंढरीची वाट धरा | म्हणे वारकरी ||२||
खाऊ चून भाकरी | चला गाठू पंढरी |
मुखे बोलू श्रीहरी | म्हणे वारकरी ||३||

तुळस घेऊ डोईवरी | आम्ही विठूचे माळकरी |
विठ्ठल विठ्ठल हरी | म्हणे वारकरी ||४||
सगुण भक्तीचा संग | वारकरी होतो दंग |
गातो रसाळ अभंग | राम कृष्ण हरी ||५||
हरीनाम गर्जते वाणी | चालू आम्ही अनवाणी |
पाहू चला चक्रपाणि | पांडुरंग हरि ||६||

वेध आता आषाढीचे | नाम मुखी विठ्ठलाचे |
विठ्ठल नामे नाचे | विठूचा वारकरी ||७||
टाळ मृदुंग वाजे | तुळशीमाळ गळा साजे |
विठ्ठल नाम गर्जे | चाले वारकरी ||८||
ऊंच पताका फडकती | वारकरी फेर धरती |
घागरी  डोईवरती  | चाले वारकरी ||९||

चंदन टिळा कपाळी | टाळ वीणा वाजे चिपळी |
पालखी हि आगळी | चाले वारकरी ||१०||
भक्त जमले प्रांगणी | अश्व धावतो रिंगणी |
पहा सोहळा पटांगणी | म्हणे वारकरी ||११||
वारक-यांचा हा मेळा | उभा विठोबा सावळा |
पाहू भरुनिया डोळा | म्हणे वारकरी ||१२||

अबीर गुलाल उधळा | उधाण भजनी मंडळा |
आनंद भरला सगळा | विठ्ठलाच्या दारी ||१३||
उत्सव हा वेगळा | एकमेका भेटू गळा |
पाहू विठू वेळोवेळा | चंद्रभागेतिरी ||१४||


प्रेषक  - सुरेश रघुनाथ पित्रे. चेंदणी, ठाणे
संपर्क - ०२२ - २५३२६४२९ ,
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९ ,